महापरिक्षा पोर्टल बंद होणार

महापरिक्षा पोर्टल बंद होणार

महाराष्ट्र राज्य मंत्रालय

सरकारी नोकरभरतीसाठी वापरण्यात येणारे महापरीक्षा पोर्टल बंद करण्याचा निर्णय महाविकास आघाडी सरकारने घेतला आहे. आता नोकरभरतीसाठी जाहिरात ते निवड प्रक्रियेचे संचालन संबंधित विभागाच्या स्तरावर करण्यात येणार आहे. प्रशासनातील गट क आणि ड पदभरतीसाठी महापरीक्षा पोर्टलद्वारे परीक्षा घेण्यात येत होती. मात्र, या पोर्टलच्या संदर्भात अनेक तक्रारी होत्या. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे तसेच युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजीत तांबे यांनी महापरीक्षा पोर्टल बंद करण्याची मागणी केली होती. ही मागणी लक्षात घेऊन मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी पोर्टलद्वारे घेण्यात येणार्‍या परीक्षांना स्थगिती दिली होती.

या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने महापरीक्षा पोर्टल बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. सामान्य प्रशासन विभागाने गुरुवारी यासंदर्भातील शासन आदेश जारी केला. या निर्णयानुसार सरकारच्या विविध विभागातील गट क आणि गट ड पदभरती संदर्भात परीक्षा प्रक्रिया राबविण्यासाठी नवीन निविदा प्रक्रिया राबविण्यात येऊन सेवा पुरवठादार कंपन्या (सर्व्हिस प्रेव्हायडर) सूचीबध्द (एम्पानेलमेंट) करण्याची कार्यवाही महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ (महाआयटी) मार्फत करण्यात येईल. त्यानुसार एम्पानेलमेंटमध्ये निवड झालेल्या कंपन्यांकडून संबंधित विभागास परीक्षा आयोजित करता येतील. जाहीरात ते निवड प्रक्रिया या परीक्षा प्रक्रियेचे संचालन संबंधित विभागस्तरावर होईल, असे आदेशात म्हटले आहे.

सध्या ज्या प्रकरणात जाहीरात प्रसिद्ध होऊन निवड प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे अथवा परीक्षेचे आयोजन बाकी आहे, अशा प्रकरणात संबंधित विभागांना आवश्यक माहिती महाआयटीकडून हस्तांतरीत करण्यात येईल, असेही आदेशात नमूद केले आहे.

First Published on: February 21, 2020 6:51 AM
Exit mobile version