खळबळजनक ! जन्मदेत्या बापानेच संपवले पोटच्या पोराला; गावगुंड मुलाचा सुपारी देऊन खून

खळबळजनक ! जन्मदेत्या बापानेच संपवले पोटच्या पोराला; गावगुंड मुलाचा सुपारी देऊन खून

नाशिक : मुलाची गावगुंडगिरी, मद्यपान करणे आणि आई-वडिलांना होणारी मारहाण असह्य झाल्यामुळे बापानेच 70 हजार रुपये सुपारी देऊन त्याचा काटा काढल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ही घटना सिन्नर तालुक्यातील पास्ते येथे मंगळवारी (दि.२७) सकाळी ११ वाजेच्या सुमारास घडली. सिन्नर पोलिसांनी मयत तरुणाच्या वडिलांसह दोघांना अटक केली आहे.

राहुल शिवाजी आव्हाड (३०) असे मयत तरुणाचे नाव आहे. वडील शिवाजी आव्हाड, वसंता अंबादास आव्हाड (40) व विकास उर्फ बबलू शिवाजी कुटे (42) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. पोलिसांच्या माहितीनुसार, सतत मद्यपान करून गावात गावगुंडगिरी करणे व आई-वडिलांना मारहाण करण्याचे प्रकार राहुलकडून सुरू होते. त्याच्या व्यसनाला कुटुंबिय आणि नातलग वैतागले होते. दरम्यान, मंगळवारी (दि.२७) सकाळी ११ वाजेच्या सुमारास पास्ते शिवारातील बंद पडलेल्या स्फोटक कंपनीच्या मीटर हाऊसमध्ये राहुल मृत अवस्थेत आढळून आला. घटनेची माहिती मिळताच सिन्नरचेे पोलीस निरीक्षक राजेंद्र कुटे यांच्यासह पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. एका खोलीत गळाफास दिलेल्या अवस्थेत राहुलचा मृतदेह पोलिसांना आढळून आला. तर जवळच दारूच्या रिकाम्या बाटल्या असल्याने पोलिसांकडून घातपाताचा संशय व्यक्त करण्यात आला.

पोलीस तपासात मुलाच्या वाईट प्रवृत्तीमुळे जन्मदात्या बापानेच त्याला सुपारी देऊन संपवण्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला. शिवाजी आव्हाड यांनी गावातीलच वसंता अंबादास आव्हाड व विकास कुटे या दोघांना राहुलला ठार मारण्याची सुपारी दिली होती. सोमवारी त्यांनी वसंत आव्हाड याच्या बँक खात्यावर 20 हजार रुपये ऑनलाईन ट्रान्सफर केले व 50 हजार रुपये रोख दिले होते. पोलिसांच्या तांत्रिक विश्लेषणात वसंत आव्हाड याने दारू पिण्याच्या बहाण्याने राहुलला बंद पडलेल्या कंपनीकडे नेल्याचे निष्पन्न झाले होते. तेथे विकास आधीच उपस्थित होता. तिघांनी मद्यपान केल्यावर कमरेच्या पट्ट्याने गळा आवळून राहुलचा खून केला व दोघे पळून गेले. वडील शिवाजी आव्हाड यांनी मुलाच्या खूनाची कबुली दिल्यावर सिन्नर पोलिसांनी तिघांना अटक केली. उपनिरीक्षक आजिनाथ कोठाळे पुढील तपास करत आहेत.

आईला मारहाण, मध्यस्थी झालेली महिला कोमात

राहुलने शनिवारी मद्यपान करून घरी आल्यावर आई-वडिलांना मारहाण केली होती. त्यावेळी त्याच्या आईला सोडवण्यासाठी मध्ये पडलेल्या शेजारच्या महिलेवर देखील हल्ला करून त्याने तिला गंभीर जखमी केले होते. महिलेच्या डोक्यात दगड घातल्याने ती कोमामध्ये आहे. या प्रकरणानंतर वडील शिवाजी अव्हाड यांनी सिन्नर पोलीस ठाण्यात मुलाविरुद्ध तक्रार दिली होती. त्याला शोधण्यासाठी गावात आलेल्या पोलिसाना बघून राहुल फरार झाला होता. राहुलच्या त्रासामुळे गावात नेहमीच खाली पहावे लागत असल्याने शिवाजी आव्हाड यांनी आपल्या मित्रांना विश्वासात घेऊन त्यांनाच 70 हजार रुपये सुपारी देऊन त्याचा काटा काढण्यास सांगितले होते.

First Published on: September 30, 2023 12:45 PM
Exit mobile version