सीईटी सेलकडून अर्ज नोंदणीसाठी 11 मेपर्यंत मुदतवाढ

सीईटी सेलकडून अर्ज नोंदणीसाठी 11 मेपर्यंत मुदतवाढ

राज्यातील विद्यापीठांच्या परीक्षा आणि जेईई परीक्षेमुळे राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाकडून सीईटीच्या परीक्षांचे वेळापत्रक ऑगस्टपर्यंत पुढे ढकलण्यात आले आहे. त्या पार्श्वभूमीवर सीईटी परीक्षांसाठीच्या नोंदणीसाठी मुदतवाढ देण्याची मागणी विद्यार्थी व पालकांकडून होत होती. विद्यार्थ्यांची मागणी लक्षात घेता तंत्र शिक्षण विभागांतर्गत येणार्‍या विविध अभ्यासक्रमांच्या नोंदणीसाठी 11 मेपर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय सीईटी सेलकडून जाहीर करण्यात आला आहे.

शैक्षणिक वर्ष 2022-23 साठी राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत तंत्रशिक्षण विभागांतर्गत घेण्यात येणार्‍या एमएचटी सीईटी, एमबीए, एमएमएस, एमसीए, एम.आर्च, एम.एचएमसीटी या अभ्यासक्रमांच्या ऑनलाईन नोंदणी प्रक्रियेस मुदतवाढ मिळण्याबाबत विद्यार्थी व पालकांकडून सीईटी सेलकडे दूरध्वनीद्वारे, ई-मेलद्वारे व प्रत्यक्ष भेट देऊन विनंती करण्यात येत होती. त्याचदरम्यान विद्यापीठांच्या परीक्षा व जेईईमुळे परीक्षांचे वेळापत्रक ऑगस्टपर्यंत पुढे ढकलण्यात आल्याने सीईटी सेलकडून या अभ्यासक्रमांच्या नोंदणीसाठी 4 ते 11 मेपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

ही मुदतवाढ अंतिम असून, यापुढे कोणत्याही परिस्थितीत मुदवाढ देण्यात येणार नाही, असे सीईटी सेलकडून सांगण्यात आले. आतापर्यंत राज्यात होणारी १६ सीईटी अभ्यासक्रमांच्या परीक्षांसाठी १० लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. त्यामधील ९ लाख २६ हजार विद्यार्थ्यांनी शुल्क भरून अर्जनिश्चितीही केली आहे, मात्र अद्यापही १ लाख ५८ हजार ८५५ विद्यार्थ्यांनी अद्याप अर्ज पूर्ण भरले नसल्याची माहिती सीईटी सेलच्या संकेतस्थळावर देण्यात आली आहे.

दरम्यान, यापूर्वीच उच्च शिक्षण विभागांतर्गत येणार्‍या एलएलबी 3 वर्षे, एलएलबी 5 वर्षे, बी.पी.एड, एम.एड, बीएड-एमएड (एकात्मिक), बीए-बीएड. बीएसस्सी (एकात्मिक) या अभ्यासक्रमांच्या नोंदणीसाठी 22 जूनपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे, तर बीएड, एमपीएड या अभ्यासक्रमांच्या नोंदणीसाठी 7 जुलैपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

First Published on: May 5, 2022 3:00 AM
Exit mobile version