बनावट नोटांचा कारखाना उद्ध्वस्त, नोटा वितरणासाठी नेमले होते एजंट

बनावट नोटांचा कारखाना उद्ध्वस्त, नोटा वितरणासाठी नेमले होते एजंट

बनावट नोटांचं गुजरात-महाराष्ट्र कनेक्शन काही महिन्यांपूर्वी उघड झालं होतं. आता याच घटनेशी संबंधित सुरगाण्यातून पोलिसांनी तब्बल ६ लाखांच्या नोटांसह छपाई मशीन जप्त केलंय. सुरगाणा पोलिसांच्या या कारवाईत चौघांना अटक झालीय. गुन्ह्याची व्याप्ती वाढत असल्यानं आरोपींची संख्या वाढण्याची शक्यता वर्तवली जातेय. विशेष म्हणजे ग्रामीण भागातील अज्ञानाचा गैरफायदा घेण्यासाठी मुख्य संशयितांनी त्या भागांत बनावट नोटा चलनात आणण्यासाठी एजंटदेखील नेमले होते.

उंबरठाण (ता. सुरगाणा) येथील पोळ्याच्या निमित्ताने भरलेल्या आडवडे बाजारात बनावट नोटा चलनात आणणार्‍या दोघांना सुरगाणा पोलिसांनी ६ सप्टेंबर रोजी अटक केल्याची घटना ताजी असताना रविवारी (दि.१२) सुरगाणा पोलिसांनी बनावट नोटांचे रॅकेट उद्ध्वस्त केले असून, पोलिसांनी चौघांना अटक केली आहे. त्यांच्या ताब्यातून सुमारे सहा लाखांच्या नोटा व छपाई मशीन जप्त केली आहे. न्यायालयाने चौघांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

मागील पाच महिन्यापूर्वी उंबरठाण परिसरातील चौघांना बनावट नोटा तयार केल्याप्रकरणी अटक करण्यात आली होती. गुन्ह्याची व्याप्ती वाढत असल्याने आणखी संशयित आरोपींसह त्यांच्याकडून बनावट नोटा ताब्यात मिळल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. किरण गिरमे (रा.विंचुर, ता.निफाड), प्रकाश पिंपळे (रा.येवला), राहुल बडोदे व अनंता गुंभार्डे (दोघेही रा. चांदवड) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.

पोलिसांच्या माहितीनुसार, उंबरठाण येथील पोळ्याच्या आठवडे बाजारात बनावट नोटा चलनात आणल्याप्रकरणी पोलिसांनी संशयित येवल्याचा बांधकाम व्यावसायिक हरीश वाल्मिक गुजर व बाबासाहेब भास्कर सैद (रा. चिचोंडी खुर्द) अटक केली. पोलिसांनी दोघांच्या ताब्यातून १९ हजार ९०० रुपयांच्या बनावट नोटा, स्कोडा कार, दोन मोबाइल असा अडीच लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. पोलीस दोघांची चौकशी करत असताना धक्कादायक माहिती समोर आली. बनावट नोटा रॅकेटमध्ये आणखी चौघे असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.

विशेष म्हणजे, संशयित एक आरोपी विंचूरमधील असून, तो घरीच छपाई मशीनव्दारे बनावट तयार करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. सुरगाणा पोलिसांना एकास सापुतारा येथून अटक केली. पोलीस तपासात विंचूर येथील किरण गिरमेचे नाव समोर आले. त्यानुसार पोलिसांनी रविवारी (दि.१२) सापळा रचून संशयित किरण गिरमे यास अटक केली. पोलिसांनी त्याची चौकशी केली असता त्याने तिघांसमवेत बनावट नोटा तयार केल्याची माहिती पोलिसांना दिली. त्यानुसार पोलिसांनी तिघांना अटक केली. चौघांच्या ताब्यातून पोलिसांनी १०० व ५०० दराच्या सुमारे सहा लाखांच्या बनावट जप्त केल्या. याप्रकरणी सुरगाणा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. चौघांना न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे.

First Published on: September 14, 2021 4:27 PM
Exit mobile version