सावधान! लॉकडाऊनचे नियम बदलेले नाहीत, व्हॉट्सअपवर फिरणारा मेसेज फेक

सावधान! लॉकडाऊनचे नियम बदलेले नाहीत, व्हॉट्सअपवर फिरणारा मेसेज फेक

प्रातिनिधिक छायाचित्र

दोन महिने लॉकडाऊनमध्ये काढल्यानंतर सामान्य जनतेचा आता धीर सुटायला लागला आहे. कधी एकदा आपण बाहेर पडतो, असे अनेकांना वाटत असेल. अनेकांच्या या इच्छेला खतपाणी घालण्याचे काम सोशल मीडियाद्वारे केले जात आहे. २९ मे पासून सलून, ब्युटी पार्लर दुकाने उघडणार असल्याचा मेसेज महाराष्ट्र सरकारच्या अधिसूचनेच्या नावाने फिरत आहे. मात्र हा मेसेज फेक असल्याचे खुद्द महाराष्ट्र सरकारने आता स्पष्ट केले आहे. त्यामुळे तुम्हीही आलेला मेसेज माहितीस्तव पुढे पाठविण्याचा शहाजोगपणा करत असाल तर सावधान! कारण तुम्ही खोटी माहिती पसरवत आहात.

२५ मार्च रोजी अचानक लॉकडाऊन घोषित केल्यानंतर लोकांना घरीच थांबण्यावाचून पर्याय नव्हता. या काळात ज्यांना शक्य होते, त्यांनी घरीच दाढी आणि केस कापण्याचा उद्योग केला. काहींनी दाढी आणि केस वाढवले. मात्र आता अनेकजण चातकाप्रमाणे सलून उघडण्याची वाट पाहत आहेत. त्यामुळे सोशल मी़डियावर व्हायरल झालेला मेसेज आनंदाच्या भरात पुढे फॉरवर्ड केला जात आहे. मात्र अशा प्रकारचे कुठलेही आदेश सरकारने काढले नसल्याचे आता स्पष्ट जाले आहे.

मेसेज काय आहे?

शुक्रवार २९ मे पासून सलून आणि ब्यूटी पार्लर सुरु करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. तसेच बगिचे, मैदाने, फूटपाथ अशा सार्वजनिक ठिकाणी जॉगिंग, मॉर्निंक वॉक, सायकलिंग करण्यासाठी पहाटे पाच ते संध्याकाळी सात वाजेपर्यंत परवानगी दिलेली आहे, असा मजकूर सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.

राज्य सरकारने वेळीच हस्तक्षेप करत ही बातमी फेक असल्याचे सांगितले आहे. अन्यथा लोक मोठ्या संख्येने शुक्रवारी बाहेर पडले असते. आता मात्र लोकांनी हे मेसेज पाठविण्याआधी एकदा खातरजमा जरूर करावी.

First Published on: May 28, 2020 11:27 AM
Exit mobile version