खरेंचे खोटे कारनामे : सव्वालाख पगार कोट्यवधींची प्रॉपर्टी

खरेंचे खोटे कारनामे : सव्वालाख पगार कोट्यवधींची प्रॉपर्टी

नाशिक : जिल्हा उपनिबंधक सतीश खरेला दरमहा १ लाख २५ हजार पगार मिळत होता, तरी देखील त्याची भूक भागत नव्हती. त्यांचे बँकेत तब्बल १३ खाते आहेत. या खात्यावर लाखो रुपयांचे व्यवहार झाले आहेत. त्यांनी नाशिक बाजार समिती कर्मचार्‍यांना सहावा वेतन आयोग लागू करण्यासंदर्भात लाखो रूपये घेतल्याची चर्चा आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकास खरेच्या घराची झडती घेतली असता १५ लाख ८६ हजार रुपये व ३६ लाखांचे ५४ तोळे सोने सापडले. लॉकरमध्ये लाखो रुपये असण्याची शक्यता आहे. पथकास खरे यांच्या घरात काही महत्वपूर्ण कागदपत्रे हाती लागली आहेत. त्यामध्ये लाखो रुपयांच्या नोंदी आहेत. त्यांची बेहिशेबी मालमत्ता असण्याची शक्यता आहे. त्याचा शोध लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून घेतला जात आहे.

अशी आहे प्रॉपर्टी

कॉलेज रोड परिसरात ३ बीएचके फ्लॅट,
१३ बँक खाते, दोन लक्झरी कार, लॉकर

शेलूत २५ एकर तर करेत १८ एकर जागेची खरेदी?

सतीश खरेने काही वर्षांपासून इतकी माया जमा केली आहे की, तिचा वापर कुठे करायचा असाही प्रश्न त्याच्यासमोर होता. त्याने चांदवड तालुक्यात शेलू या गावात नुकतीच २५ एकर जागा त्याच्या पत्नीच्या नावाने खरेदी केल्याचे समजते. तसेच सटाणा तालुक्यात करे या गावातही १८ एकर जागा खरेदी केल्याची चर्चा आहे. लाचलूचपत प्रतिबंधक विभागाने याची शहानिशा केल्यास खरेकडे इतका पैसा कोठून आला याची चौकशी करता येईल.

संशयकल्लोळासह कर्मचारी खुश

मंगळवारी (दि.१६) दिवसभर जिल्हा उपनिबंधक कार्यालयात शांतता पसरली होती. कर्मचारी एकमेकांना संशयाने पाहत होते. खरेला अटक झाल्याने अनेक कर्मचारी खुश देखील दिसत होते.

चार महिन्यांत चौथी कारवाई

नाशिक जिल्हा उपनिबंधक कार्यालयातील तीन तालुका उपनिबंधकांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गेल्या चार महिन्यांत लाच घेताना अटक केली आहे. सिन्नर सहकारी संस्थांच्या सहायक निबंधक एकनाथ पाटीलला २ मार्च २०२३ रोजी लाच घेताना अटक करण्यात आली. त्यांच्यावर कारवाई झाल्याने या कार्यालयाचा अतिरिक्त सहायक निबंधक कार्यभार रणजित पाटीलकडे सोपविण्यात आला होता. मात्र, एकनाथ पाटीलच्याही पुढे जात रणजित पाटीलने २० लाख रुपयांची लाच स्विकारली. त्यांचा संशयित साथीदार प्रदीप वीरनारायणला पाठलाग करून अटक करण्यात आली. त्यानंतर सोमवारी जिल्हा उपनिबंधक सतीश खरे यांना तब्बल ३० लाख रुपयांची लाच घेताना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणांमुळे उपनिबंधक विभागाची लाचखोरी चर्चेत आली आहे.

First Published on: May 17, 2023 12:55 PM
Exit mobile version