LockDown : तमाशा व लोककलावंतांवर उपासमारीची वेळ!

LockDown : तमाशा व लोककलावंतांवर उपासमारीची वेळ!

राज्यात कोरोनामुळे लॉकडाऊन वाढवण्यात आला आहे. मात्र या लॉकडाऊनच्या काळात जसे हाल मजुरांचे होत आहेत तसेच हाल तमाशा आणि लोक कलावंतावर आली आहे. शेतकरी आणि मजुर वर्गाला जगण्याची उमेद देण्याबरोबरच लोक कलेच्या माध्यमातून जनजागृती करणाऱ्या राज्यातील सुमारे १ लाख  ६५ हजारांपेक्षा अधिक तमाशा व लोक कलावंतांवर लॉकडाऊनमुळे उपासमारीची वेळ आली आहे. लॉकडाऊनमुळे राज्यातील धार्मिक यात्रा आणि जत्रा बंद असल्यामुळे या लोक कलावंताची रोजरोटी बंद झाली आहे. त्यामुळे जागायचे कसे असा प्रश्न या कलावंतांसमोर उभा राहिला आहे. याचमुळे व्यथित झालेल्या या लोक कलावतांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार व जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांना साद घातली आहे. दरम्यान याच पार्श्वभूमीवर पठ्ठेबापूराव लोकनाट्य मराठी तमाशा परिषद(महाराष्ट्र राज्य)या संस्थेचे अध्यक्ष संभाजी जाधव  यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते जयंत पाटील यांना ई मेल करून लोककलावंतांच्या व्यथा मांडल्या आहेत.  राज्यातील सुमारे एक लाख ६५ हजार ५३० लोककलावंतांच्या प्रश्नाकडे त्यांनी लक्ष वेधले आहे.

म्हणून उपासमारीची वेळ 

महाराष्ट्रात तमाशा कलावंतांपासून दशावतारी नाटकातील कलावंत, टाळकरी, गोंधळी, नंदीबैल, पिंतळा जोशी, पोतराज अशा असंख्य कला जोपासणारे लोककलावंत आहेत. पूर्वीच्या काळात शाहिरी जलसे, तामाशाची बारी, दशावताराच्या माध्यमातून  राज्यातील शेतकरी व कष्टकरी वर्गाचे चार घटका मनोरंजन केले जात होते. मात्र आता काळ बदलला तरी अजूनही गावोगावच्या पारंपारिक जत्रा व यात्रांमध्ये लोककलावंताना मागणी आहे. पण कोरोनामुळे सर्व यात्रा व जत्रांवर बंदी आल्यामुळे या वर्गाच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे.

राज्य सरकारकडून मिळणारी रक्कमही अपुरी 

दरम्यान राज्य सरकारच्यावतीने या लोककलावंतांना दरमहा ३ हजार १५० रुपयांपासून सतराशे रुपयांपर्यतचे मानधन मिळते. पण सध्याच्या महागाईच्या दिवसात ही रक्कमही अपुरी पडत असल्याने लोककलावंताना लोककला सादर करून कुटुंबाचा गाडा चालवावा लागतो. पण आता सर्व जत्रा-यात्रा बंद असल्याने उत्पन्नाचे साधन बंद पडले आहे.  त्यामुळे आता कलावंतांवर उपासमारीची वेळ आली आहे.

लोकनाट्य तमाशा, भारुड, आराधी, पोतराज, खडीगंमत, दशावतार, वाघ्या मुरळी, भारुड, गोंधळ गीत, नंदीबैलाचा खेळा, पिंगळा जोशी कव्वाली, झाडीपाटी नाट्य, आदिवासी नृत्याच्या माध्यमातून कष्टकरी वर्गाला जगण्याची उमेद देतात. शेतकरी मजूर वर्ग हा तमाशामध्ये किंवा सुगीच्या दिवसात हसतो, डोक्यावरचा फेटा आकाशात भिरकावून आनंद व्यक्त करतो. या कष्टकरी वर्गाला जगण्याची उमेद देणारे ह लोक कलावंत सध्या दुःखात आहेत. उन्हात-थंडीत गावोगावी फिरणाऱ्या या लोककलावंतांना सध्याच्या दिवसात मदतीची गरज आहे. राज्यातील लोककलेचा वारसा टिकवणाऱ्या लोककलावंतांना न्याय मिळावा अशी अपेक्षा. – संभाजी जाधव, अध्यक्ष, पठ्ठेबापूराव लोकनाट्य मराठी तमाशा परिषद

First Published on: April 19, 2020 9:01 PM
Exit mobile version