४८ मुलांच्या बापाने मुलांसह केले मतदान

४८ मुलांच्या बापाने मुलांसह केले मतदान

48 मुलांच्या बापाने केले मतदान

लोकसभा निवडणुकीचे वारे सर्वत्र वेगात वाहत असतानाच अमरावतीत एक ऐतिहासिक घटनेची नोंद झाली आहे. तब्बल ४८ मुलांचा बाप असलेल्या एका इसमाने आपल्या ४८ मुलांबरोबर मतदानाचा हक्क बजावला. शंकरबाबा पापळकर, असं त्या पित्याचं नाव आहे. तुम्हाला हे वाचून आश्चर्य वाटलं असेलं. पण ४८ मुलं ही एका वसतीगृहातील आहेत. या मुलांच शंकरबाब यांनी पितृत्व स्विकारलं आहे.

अचलपूर तालुक्यातील वझ्झर येथील स्व. अंबादासपंत वैद्य दृष्टिहीन , दिव्यांग , मतिमंद, बेवारस मुलांच्या वसतीगृहातील ही मुले आहेत. चार दृष्टिहीन, १५ मूकबधीर व दहा पोलिओग्रस्त मुलांचासुद्धा त्यात समावेश आहे. गेल्या १५ ते २० वर्षांपासून ही मुले या वसतीगृहात राहत आहेत. सर्वांच्या नावापुढे शंकरबाबा पापळकर हेच नाव असल्याने तेच त्यांचे पिता आहेत.

अखेर मुलांना त्यांचा हक्क मिळाला

रस्त्यावर, कचराकुंडीत, रेल्वेस्टेशन, बसस्थानकावर तसेच अन्य ठिकाणी फेकून दिलेल्या किंवा मातापित्यांनी टाकून दिलेल्या मुलांचा सांभाळ शंकरबाबा पापळकर पित्याप्रमाणे करतात. या मुलांना रोजगार मिळवून देण्यासोबतच त्यांचे लग्न लावून देण्याचे अतिशय आव्हानात्मक कार्य शंकरबाबांनी गेल्या अनेक वर्षांपासून हाती घेतले आहे. आपल्या मुलांना मतदानाचा हक्क मिळावा, यासाठीसुद्धा त्यांनी चांगलाच लढा दिला. अखेर तब्बल ४८ मुलांना यंदाच्या लोकसभा निवडणुकीत मतदानाचा हक्क मिळाला.

दिव्यांगांसाठी शासनाने या वेळी वाहनांची व्यवस्था केली असली तरी या मुलांनी शासकीय व्यवस्था नाकारून मतदान केंद्रापर्यंत पायी जाण्याचा निर्णय घेतला होता. या ४८ जाणांमध्ये १० मुलं आणि तब्बल ३८ मुली आहेत. ४८ दिव्यांग, निराधार, अनाथ मुलांनी एकाच वेळी मतदान करण्याची देशातील ही पहिलीच घटना असल्याचे मानले जात आहे.

First Published on: April 18, 2019 8:21 PM
Exit mobile version