ऐन सणासुदीत ६६ लाखांवर किंमतीचे भेसळयुक्त अन्नपदार्थ जप्त

ऐन सणासुदीत ६६ लाखांवर किंमतीचे भेसळयुक्त अन्नपदार्थ जप्त

पंकज रोडेकर, ठाणे

सणासुदीच्या कालावधीत ठाणे अन्न व औषध प्रशासन (कोकण) विभागाने हाती घेतलेल्या कारवाईत ६६ लाख ४७ हजार रुपयांहून अधिक रुपयांचा भेसळयुक्त अन्नपदार्थ जप्त केला आहे. ही कारवाई कोकण विभागात २० सप्टेंबर ते ३१ ऑक्टोबर दरम्यान करण्यात आली. यामध्ये ठाणे जिल्ह्यात केलेल्या कारवाईतील सुमारे ६४ लाखांचे खाद्यपदार्थांचा समावेश आहे. तसेच ही कारवाई १३ नोव्हेंबरपर्यंत अशी सुरू राहणार असल्याची माहिती ठाणे एफडीएने दिली आहे.

कोकण विभागात ठाणे, पालघर, रायगड, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी हे पाच जिल्हे येतात. या जिल्ह्यात एफडीएचे कोकण विभाग सहआयुक्त शिवाजी देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली त्या-त्या जिल्ह्यातील सहाय्यक आयुक्तांद्वारे सणासुदीच्या कालावधीत अन्नपदार्थ, तेल-तूप आणि मावा तसेच मिठाई आदी खाद्यपदार्थांची मोठ्या प्रमाणात होणारी भेसळ लक्षात घेऊन कारवाईचा बडगा हा गणपतीपासून हाती घेतला. त्यातच दिवाळीत मोठ्या प्रमाणात तेल-तूप, मावा-खवा आणि मिठाई तसेच इतर भेसळयुक्त खाद्यपदार्थांची विक्री होऊ शकते. यासाठी विशेष खबरदारी घेत तपासणी मोहीम सुरू ठेवली आहे. त्यानुसार, २० सप्टेंबर ते ३१ ऑक्टोबर दरम्यान केलेल्या कारवाईत खवा-माव्याचे ७ नमुने घेत, ८९ हजार १२४ रुपयांचा ४६२ किलोचा मुद्देमाल जप्त केला.

यामध्ये ठाणे जिल्ह्यात ८७ हजार २४ रुपयांच्या मुद्देमालाचा समावेश आहे. उर्वरीत २१०० रुपयांचा मुद्देमाल हा सिंधुदुर्ग येथे जप्त केला आहे. तेल, तूप आदी तेलजन्य पदार्थ ठाणे आणि पालघर जिल्ह्यातून ६३ लाख ९१ हजार ८६० रुपये किमतीचे जप्त केले आहेत. तसेच या पाच जिल्ह्यातून एकूण ११२ नमुने घेतले असून त्यामध्ये ठाणे ८२, पालघर १५, रायगड ७, रत्नागिरी ६ आणि सिंधुदुर्ग २ आहेत. तसेच बेसन, रवा, डाळ यासारख्या आदी अन्य पदार्थांचा १ लाख ६६ हजार ७२० रुपयांचा असून तोही पालघर जिल्ह्यात केलेल्या कारवाईत जप्त केला गेला आहे. दरम्यान, यासंदर्भात २२८ नमुने घेण्यात आले आहे. यामध्ये सर्वाधिक १२८ नमुने ठाणे जिल्ह्यातून घेतले गेले आहेत. तर पालघर येथून ५८, रायगड २७, रत्नागिरी १५ नमुने घेतले असून सिंधुदुर्गातील नमुना संख्या शून्य आहे.

मिठाईचे पाच जिल्ह्यातून ७२ नमुने

सणासुदीच्या दिवसात मिठाईची मोठ्या प्रमाणात खरेदी केली जाते. यादरम्यान, एफडीएने पाच जिल्ह्यातून एकूण ७२ नमूने घेतले आहेत. त्यामध्ये सर्वाधिक ३९ नमुने हे ठाण्यात घेतले गेले आहेत. त्याखालोखाल पालघर १४, रायगड ९ आणि रत्नागिरी व सिंधुदुर्ग येथे प्रत्येक ५ नमुने घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

सणासुदीच्या दिवसात भेसळयुक्त पदार्थांची विक्री होण्याची शक्यता लक्षात दरवर्षीप्रमाणे यंदा ही तपासणी मोहिम हाती घेतली आहे. त्यातच केलेल्या कारवाईत ६६ लाख ४७ हजार ७०४ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. त्याचबरोबर काही खाद्यपदार्थांचे नमुने घेतले आहेत. तसेच ही कारवाई दिवाळी कालावधीत तीव्र केली असून ती १३ नोव्हेंबरपर्यंत सुरू राहणार आहे.
– शिवाजी देसाई , सह आयुक्त, अन्न व औषध प्रशासन विभाग (कोकण)

First Published on: November 8, 2020 11:59 PM
Exit mobile version