एफडीएची आठवड्यातील भिवंडीत तिसरी कारवाई

एफडीएची आठवड्यातील भिवंडीत तिसरी कारवाई

ठाणे । महाराष्ट्रात गुटखा आणि तंबाखूजन्य विक्रीस किंवा बाळगण्यास तसेच त्याची बेकायदेशीर वाहतूक करण्यास बंदी असताना, ठाणे अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) आठवड्यात भिवंडीतच तिसरी कारवाई केली आहे. या कारवाईत 22 लाख 36 हजारांचा प्रतिबंधित अन्नपदार्थाचा साठ्यासह दोन वाहने ताब्यात घेतली आहेत. तसेच चौघांविरुद्ध नारपोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आहे. तसेच त्या वाहनांसोबत अन्नपदार्थांची वाहतूक करताना वस्तू व सेवा कर अधिनियम अंतर्गत ई वे बिल आणि किंवा वाहनात असलेल्या अन्नपदार्थबाबत कोणताही कायदेशीर पुरावा,बिल नसल्याने त्याअनुषंगाने वस्तू व सेवा कर कार्यालयाकडे तक्रार करण्यात आली आहे. अशी माहिती ठाणे एफडीएने दिली. तसेच याबाबत वस्तू व सेवा कर विभाग काय कारवाई करतेय हेच पाहावे लागणार आहे.

26 नोव्हेंबर रोजी ठाणे अन्न आणि औषध प्रशासन,विभागाने मिळालेल्या माहितीच्या आधारे भिवंडी, दापोडा गाव,ओढाव कॉम्प्लेक्स,या ठिकाणी एका वाहनातून प्रतिबंधित अन्नपदार्थ क्रॉसिंग करून दुसर्‍या वाहनामध्ये भरले जात असताना छापा टाकला. अन्न व औषध प्रशासन, ठाणे कार्यालयातील अन्न सुरक्षा अधिकारी रामलिंग बोडके यांनी केलेल्या कारवाईत त्या वाहनातून प्रतिबंधित अन्नपदार्थ रोकडा पान मसाला, बंदर सुगंधीत चघळण्याची तंबाख नजर गुटखा 90000 व रजनीगंधा सुगंधित पानमसाला यांचा सुमारे रुपये 22 लाख 35 हजार 960 रुपयांचा साठा आढळून आला. तसेच प्रतिबंधित अन्नपदार्थाचा साठा व दोन्ही वाहने ताब्यात घेतला. याशिवाय रवी कुमार शरणप्पा गोरांकी, नासिर चंद खान, सुहास नवनाथ जाधव व एका वाहनाच्या अज्ञात मालक अशा चौघांविरुद्ध नारपोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला.

याचदरम्यान वाहनांसोबत अन्नपदार्थांची वाहतूक करताना वस्तू व सेवा कर अधिनियम अंतर्गत ई वे बिल आणि किंवा वाहनात असलेल्या अन्नपदार्थबाबत कोणताही कायदेशीर पुरावा बिल नसल्याने त्याअनुषंगाने वस्तू व सेवा कर कार्यालयात याची तक्रार करत कायदेशीर कारवाई करण्याची विनंती केली असून प्रतिबंधित अन्नपदार्थाचे वाहतूक केल्याप्रकरणी या प्रकरणातील दोन्ही वाहनांची नोंदणी प्रमाणपत्र तसेच दोन्ही वाहनचालकाचा वाहन परवाना रद्द करण्याबाबत प्रादेशिक परिवहन अधिकारी यांच्याकडे पत्रव्यवहार करून त्याचा पाठपुरावा करण्यात येणार आहे. अशी माहिती एफडीएने दिली.
ही कारवाई अन्न व औषध प्रशासन विभागाचे कोकण विभाग, ठाणे सह आयुक्त (अन्न), सुरेश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणे अन्न सुरक्षा अधिकारी रामलिंग बोडके यांनी अन्न सुरक्षा अधिकारी दिवाकर कांबळे यांच्या उपस्थितीत केली.

First Published on: November 28, 2022 5:52 PM
Exit mobile version