अखेर मुख्यमंत्र्यांना वेळ मिळाला; उद्या मुबंईतील ४ कोरोना केंद्रांचे उद्घाटन करणार

अखेर मुख्यमंत्र्यांना वेळ मिळाला; उद्या मुबंईतील ४ कोरोना केंद्रांचे उद्घाटन करणार

प्रातिनिधिक छायाचित्र

मुलूंड, दहिसर, महालक्ष्‍मी रेसकोर्स आणि वांद्रे-कुर्ला संकूल या ४ ठिकाणच्या कोरोना आरोग्य केंद्राची उभारणी होवून अनेक दिवस लोटले. परंतु कोरोना काळजी केंद्र उभारल्यानंतरही केवळ मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचा वेळ मिळत नसल्याने त्याच्या लोकार्पणाचा कार्यक्रम पुढे ढकलला जात होता. पण अखेर राज्याच्या मुख्यमंत्र्यांना या चारही केंद्राच्या लोकार्पणासाठी वेळ मिळाला आहे. मंगळवारी यासर्व केंद्रांमधील एकूण ३ हजार ५२० रुग्‍णशय्या (बेड) कोरोना बाधितांच्या उपचारासाठी खुले केले जाणार आहे.

मुलूंड, दहिसर, महालक्ष्‍मी रेसकोर्स आणि वांद्रे-कुर्ला संकूल या ४ ठिकाणी उभारण्यात आलेल्या कोरोना आरोग्य केंद्रांचे लोकार्पण मंगळवारी दुपारी दीड वाजता व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे राज्‍याचे मुख्‍यमंत्री उद्धव ठाकरे यांच्‍या हस्‍ते करण्‍यात येणार आहे. या समारंभात राज्‍याचे वस्‍त्रोद्योग मंत्री, मुंबई शहराचे पालकमंत्री अस्‍लम शेख, राज्‍याचे पर्यावरण मंत्री व मुंबई उपनगराचे पालकमंत्री आदित्‍य ठाकरे, मुंबईच्‍या महापौर किशोरी पेडणेकर, राज्‍याचे मुख्‍य सचिव संजीव कुमार, मुंबई महानगरपालिका आयुक्त इकबाल सिंह चहल, सिडकोचे व्‍यवस्‍थापकीय संचालक लोकेश चंद्र, मुंबई मेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक रणजीत सिंह देओल यांच्‍यासह विविध मान्‍यवर ठिकठिकाणांहून व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे सहभागी होणार आहेत.

मुलुंड परिसरातील लालबहादूर शास्त्री मार्गालगतच्‍या जागेत १ हजार ७०० खाटांचे समर्पित कोरोना आरोग्‍य केंद्र ‘सिडको’च्या पुढाकाराने उभारण्यात आले आहे. यातील सुमारे ५०० रुग्‍णशय्या ठाणे महानगरपालिकेसाठी आरक्ष‍ित करुन देण्‍यात आल्‍या आहेत. दहिसर (पूर्व) येथे ‘मुंबई मेट्रो’च्या सहकार्याने सुमारे ९०० खाटांचे समर्पित कोरोना आरोग्‍य केंद्र उभारण्यात आले आहे. तर दहिसर (पश्चिम) येथे कांदरपाडा परिसरात समर्पित कोरोना रुग्‍णालय उभारण्‍यात आले असून याठिकाणी १०८ अतिदक्षता उपचार (आयसीयू) सुविधा असलेल्‍या खाटा उपलब्‍ध आहेत.

महालक्ष्‍मी रेसकोर्स येथे समर्पित कोरोना आरोग्‍य केंद्र उभारण्‍यात आले असून तेथेही ७०० रुग्‍णशय्या उपलब्‍ध आहेत. तर वांद्रे-कुर्ला संकुलात मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण यांच्‍यावतीने उभारण्‍यात आलेल्‍या दुसऱ्या टप्‍प्‍यातील समर्पित कोरोना आरोग्‍य केंद्रात ११२ रुग्‍णशय्या अतिदक्षता उपचार (आयसीयू) करण्‍यासाठी असतील. एमएमआरडीएने हा दुसरा टप्‍पा महानगरपालिकेकडे हस्‍तांतरित केला असून ते आता प्रत्‍यक्ष कार्यान्‍व‍ित केले जाणार आहे.

First Published on: July 6, 2020 8:46 PM
Exit mobile version