कोचिंग क्लास मालक आणि विनोद तावडे यांच्यात आर्थिक देवाणघेवाण – अनिल देशमुख

कोचिंग क्लास मालक आणि विनोद तावडे यांच्यात आर्थिक देवाणघेवाण – अनिल देशमुख

कोचिंग क्लासेसचे मालक आणि विनोद तावडे यांच्यामध्ये मोठया प्रमाणात आर्थिक देवाणघेवाण झाल्याने खाजगी शिकवणीबाबतचा मसुदा तयार असूनही तो पडून आहे, असा थेट आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री अनिल देशमुख यांनी पत्रकार परिषदेत आज केला. दरम्यान याकडे शिक्षणमंत्री विनोद तावडे दुर्लक्ष करत असून यामध्ये मुख्यमंत्र्यांनी लक्ष घालून खाजगी शिकवणी मसुद्याला तात्काळ मंजुरी द्यावी, अशी मागणीही अनिल देशमुख यांनी केली.

सुरत येथे कोचिंग क्लासमध्ये भीषण आग लागण्याची दुर्दैवी घटना घडली. यामध्ये २० ते २२ लहान मुलांचा मृत्यू झाला. त्यामुळे देशभरात खळबळ उडाली. महाराष्ट्रात १ लाख १० हजाराच्यावर कोचिंग क्लासेस आहेत. एकट्या मुंबईत ३० ते ३५ हजार कोचिंग क्लासेस आहेत. त्यांचे फायर ऑडिट होत नाही. आग लागली तर बाहेर पडायला जागा नाही. या क्लासेसवर कोणतेही निर्बंध नाही. कोणत्याही सोयी-सुविधा नाहीत, असा आरोपही अनिल देशमुख यांनी केला.

सुरतसारखी घटना महाराष्ट्रात किंवा मुंबईत घडू शकते. दुर्दैवाने अशी कोणती दुर्दैवी घटना घडली तर उपाययोजना करण्याची सोय शासनाकडे नाही, असेही अनिल देशमुख म्हणाले. २०१७ मध्ये कोचिंग क्लासेसवर नेमण्यात आलेल्या समितीवर विधानसभेत चर्चा झाली होती. १२ लोकांच्या समितीने हा मसुदा तयार केला होता. २०१८ ला शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्याकडे पाठवला होता. परंतु ते अद्याप त्याचे कायद्यात रूपांतर करु शकले नाहीत. विनोद तावडे यांनी लवकरात लवकर नवीन कायदा तयार करु, असे आश्वासन नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात दिले होते. परंतु त्याची अंमलबजावणी अद्याप झालेली नाही असेही अनिल देशमुख म्हणाले.

कोचिंग क्लासेसवर कायदा करावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसकडून वेळोवेळी करण्यात आली आहे. मात्र सध्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडे कोचिंग क्लासेसला मदत करत आहेत, असेही अनिल देशमुख यांनी सांगितले. या पत्रकार परिषदेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब, राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ उपस्थित होत्या.

First Published on: May 27, 2019 5:14 PM
Exit mobile version