‘फडणवीस पुन्हा येणार’ असे बॅनर लावलेल्या महापौरांवर गोळीबार

‘फडणवीस पुन्हा येणार’ असे बॅनर लावलेल्या महापौरांवर गोळीबार

महापौरांच्या गाडीवर गोळीबार, संदीप जोशी थोडक्यात बचावले

मंगळवारी नागपुरमधील हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर नागपूर महापौर संदीप जोशी आणि नागपूर शहर भाजपचे अध्यक्ष प्रविण दटके यांनी ‘तुम्ही पुन्हा येणार’ या आशयाचे फडणवीसांच्या फोटोसह बॅनरबाजी केली होती. नागपुरमधील अनेक बस स्टॉप्सवर असे बॅनर झळकत होते. मात्र मंगळवारी मध्यरात्री हेच बॅनर लावलेल्या नागपुरचे महापौर संदीप जोशी यांच्या गाडीवर गोळीबार करण्यात आला आहे. संदीप जोशी यांच्यावर मध्यरात्री जीवघेणा हल्ला केला. बाईकवरून आलेल्या दोन अज्ञातांनी महापौरांच्या गाडीवर देशी कट्ट्यातून गोळ्या झाडल्या. जोशींसह त्यांचे कुटुंब ही गाडीत होतं. पण, सुदैवाने जोशी आणि त्यांचे कुटुंबिय सुखरुप आहे. हल्ल्याचं कारण अद्याप अस्पष्ट आहे.

असा झाला संदीप जोशी यांच्या गाडीवर हल्ला 

संदीप जोशी यांच्या गाडीवर मंगळवारी रात्री बारा वाजताच्या दरम्यान गोळीबार करण्यात आला. बाईकस्वार हल्लेखोरांनी महापौरांच्या गाडीवर तीन गोळ्या झाडल्या. वर्धा रोडवर एम्प्रेस पॅलेस हॉलजवळ ही घटना घडली. जामठा भागातील नॅशनल कॅन्सर इन्स्टिटयूटहून परतत असताना अज्ञात हल्लेखोरांनी जोशींच्या गाडीवर गोळ्या झाडल्या. वर्धा मार्गावर असलेल्या जामठा येथील राष्ट्रीय कर्करोग संस्थेजवळील रसरंजन धाब्यावर त्यांच्या लग्नाच्या वाढदिवसाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. तो कार्यक्रम आटपून घरी परतताना त्यांच्यासोबत एकूण सात गाड्या होत्या. त्यांचे कुटुंबीय आणि मित्रांच्या गाड्या त्यांच्या गाडीच्या पुढे होत्या. जोशी यांची फॉर्च्युनर ही गाडी सर्वांच्या मागे धावत होती. त्यांचा ताफा राष्ट्रीय कर्करोग संस्थेजवळ येताच अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्यावर गोळीबार केला. हल्ल्यादरम्यान हल्लेखोरांनी गोळ्या झाडल्या. या गोळ्या त्यांच्या गाडीच्या काचा भेदून आत शिरल्या. मात्र, सुदैवाने कोणालाही दुखापत झालेली नाही.
संदीप जोशी यांच्यावरील हल्ल्याचं कारण अद्याप अस्पष्ट असून आरोपींना अटक झालेली नाही. या घटनेमुळे सध्या नागपुरात भीतीचं वातावरण आहे. नोव्हेंबर महिन्यात संदीप जोशी यांच्याकडे नागपुरच्या महापौरपदाची जबाबदारी सोपवण्यात आली होती. संदीप जोशी हे भाजपच्या तिकीटावर नगरसेवकपदी निवडून आले आहेत.

असा केला जातोय संशय व्यक्त

महापौरपदाच्या निवडणुकीत संदीप जोशी यांनी काँग्रेसच्या हर्षदा साबळे यांचा पराभव केला होता. संदीप जोशी यांना सव्वा वर्षांसाठी महापौरपद देण्यात आलं आहे. चार डिसेंबरला संदीप जोशी यांना जीवे मारण्याची धमकी देणारं पत्र आल्यानंतर त्यांनी तक्रार दाखल केली होती. त्यानंतर काही फोन कॉल्स ही येते होते. काही दिवसांपूर्वी संदीप जोशी यांनी अतिक्रमणविरोधी मोहीम हाती घेतली होती आणि त्यातूनच त्यांच्यावर हल्ला केला गेला असल्याचा संशय व्यक्त केला जातोय.


हेही वाचा – शेतकर्‍यांच्‍या प्रश्‍नावर आमदार भिडले


 

First Published on: December 18, 2019 11:05 AM
Exit mobile version