ठाकरे सरकार मजबूत, आधी गुजरातमध्ये राष्ट्रपती राजवट लावा – संजय राऊत

ठाकरे सरकार मजबूत, आधी गुजरातमध्ये राष्ट्रपती राजवट लावा – संजय राऊत

महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकार मजबूत असून शरद पवार आणि काँग्रेस पक्ष सरकारच्या पाठी ठामपणे उभा आहे. “महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करावी, अशी मागणी काही लोक करत आहेत. मात्र राष्ट्रपती राजवट लावायचीच असेल तर ती आधी गुजरातमध्ये लावा. कारण तेथील रुग्णालये हे अंधार कोठड्या झाले असल्याची टीका गुजरात हायकोर्टाने केली आहे. त्यामुळे गुजरातच्या राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना बोलावून समज द्यायला हवी होती”, अशी भूमिका संजय राऊत यांनी माध्यमांशी बोलताना मांडली.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे राज्यपालांच्या भेटीनंतर मातोश्रीवर गेल्यामुळे राजकीय वर्तुळात विविध तर्कवितर्कांना उधाण आले होते. त्यानंतर संजय राऊत यांनी माध्यमांसमोर स्पष्टीकरण दिले. “शरद पवार मातोश्रीवर आले तेव्हा मी स्वतः देखील त्यांच्यासोबत होतो. आम्ही कोरोनाच्या पार्श्वभूमीवर काही मार्गदर्शन घेतले असेल तर कुणालाही वाईट वाटण्याचे कारण नाही. कारण देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील पवारांचा सल्ला घेतात. महाविकास आघाडीचे सरकार बनविण्यात पवारांचे योगदान आहे. हे सरकार पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करेल”, असा ठाम विश्वास राऊत यांनी व्यक्त केला.

राज्यातील विरोधी पक्षावर आसूड ओढताना संजय राऊत म्हणाले की, “या संकटाच्या काळात सर्व राज्याने एकत्र आले पाहीजे. इतर राज्यातील विरोधी पक्ष तिथल्या सरकारसोबत ठामपणे उभा आहे. मात्र महाराष्ट्रातील विरोधी पक्ष राजकारण करत आहे. त्यांनी लंडन, न्यूयॉर्कमध्ये जावे, तिकडे गंभीर परिस्थिती असल्यामुळे त्यांना राज्य निर्माण करण्यासाठी तिथे संधी आहे”, असा चिमटा देखील राऊत यांनी काढला.

First Published on: May 26, 2020 12:20 PM
Exit mobile version