रेल्वेद्वारे जिल्ह्यासाठी साडेपाच लाख टन खतसाठा

रेल्वेद्वारे जिल्ह्यासाठी साडेपाच लाख टन खतसाठा

Five and a half lakh tonnes of Furtilizer stock for the district by rail

मनमाड : खरीप हंगामात शेतकर्‍यांना रासायनिक कमतरता भासू नये म्हणून शासनाने मनमाडसह नाशिक जिल्ह्यासाठी तब्बल ५ लाख ४६ हजार टन खतांचा साठा पाठविला आहे. गेल्या आठवड्यात रेल्वे मालगाडीचे पाच रॅक रासायनिक खते घेऊन मनमाडच्या मालधक्क्यावर दाखल झाले आहे. येथून ट्रकमधून ही खाते डीलरकडे पाठविण्यात आली असून त्यांच्याकडून मागणीनुसार जिल्ह्यातील वेगवेगळ्या भागात या खतांचा पुरवठा केला जाणार असल्याची माहिती कृषी विभागाने दिली. दरम्यान, मनमाड शहरासोबत नांदगाव तालुक्यात समाधानकारक पाऊस झाल्याने बळीराजा पेरणीच्या कामाला लागला असून सुमारे ७० टक्के पेरणी झाल्याची माहिती ही कृषी विभागाने दिली आहे.

मनमाड रेल्वेस्थानकाला खेटून असलेल्या मालधक्क्यावर गेल्या आठवड्यात एका पाठोपाठ एक अशी पाच रेल्वे मालगाडीचे रॅक रासायनिक खते घेऊन आली आहे. एक रॅक हा ४२ डब्याचा असून एका डब्याची क्षमता २ हजार ६०० टनाची आहे. ५ मालगाडीच्या २१० डब्यातून तब्बल ५ लाख ४६ हजार टन इतके रासायनिक खते नाशिक जिल्ह्याकरिता आले आहे. मनमाडसह नांदगाव तालुक्यासाठी कृषी विभागातर्फे खरीप हंगामाचा उद्दिष्ट्य सुमारे ७० हेक्टर ठेवण्यात आला असून त्यासाठी ४५ हजार ७०९ मेट्रिक टन इतकी रासायनिक खतांची तर ६८० क्विंटल बी-बियाणाची मागणी नोंदवलेली आहे. या मागणीनुसार रासायनिक खते व बी-बियाणे उपलब्ध झालेली असल्याने शेतकर्‍यांनी चिंता करू नये, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.

रब्बीचा हंगाम हातातून गेल्यानंतर शेतकर्‍याच्या सर्व आशा या आता खरीप हंगामावर आहे. काही दिवसांपासून मनमाड शहर परिसरासह नांदगाव तालुक्यात दमदार पाऊस होत असल्यामुळे बळीराजा सुखावला आहे. पेरणीला सुरुवात झाली आहे. पेरणी लायक पाऊस झाल्यामुळे आतापर्यंत सुमारे ७० टक्के शेतकर्‍यांनी पेरणी उरकून घेतली तर उर्वरित ३० टक्के शेतकरीदेखील पेरणीच्या कामाला लागला आहे. यंदा मका पेरणीवर जास्त भर दिला जात असून त्यानंतर बाजरी, कापूस, भुईमूग, मुंग, तूर, उडीद या पिकांची पेरणी केली जात आहे.

First Published on: June 19, 2020 3:56 PM
Exit mobile version