Coronavirus : महापालिकेच्या फिव्हर क्लिनिकमध्ये आढळले पाच कोरोनाचे रुग्ण

Coronavirus : महापालिकेच्या फिव्हर क्लिनिकमध्ये आढळले पाच कोरोनाचे रुग्ण

कोरोना व्हायरस

महानगरपालिकेने ९७ ‘फिव्हर क्लिनीक’मध्ये आजवर ३ हजार ५८५ व्यक्तींची कोरोना विषयक प्राथमिक तपासणी केली आहे. ज्यामध्ये ९१२ व्यक्तींचे नमुने आवश्यक त्या तपासणीसाठी वैद्यकीय प्रयोगशाळेत पाठविण्यात आले होते. त्यातील ५ व्यक्ती बाधित असल्याचे आढळून आले आहेत.  हे पाच व्यक्ती ‘ट्रॅव्हल हिस्ट्री’ असणारे वा ट्रॅव्हल हिस्ट्री असणाऱ्यांच्या निकटच्या संपर्कात असणारे होते, असे महापालिकेने स्पष्ट केले आहे.

‘कोरोना कोविड – १९’ या आजारास प्रभावी प्रतिबंध होण्यासाठी बाधित व्यक्तींचे निदान व क्वारंटाईन लवकरात लवकर करण्याच्या उद्देशाने मुंबई महानगरपालिकेने स्वतः पुढाकार घेऊन बाधित रुग्णांची शोध मोहीम राबवण्यास सुरुवात केली आहे. मुंबईत आयोजित करण्यात आले ९७ फिव्हर क्लीनिक आणि काही दिवसांपूर्वी सुरू करण्यात आलेली देशातील पहिली ‘दूरध्वनी’ हेल्पलाइन याच शोध मोहिमेचा भाग आहे. ज्या भागात ‘कोरोना कोविड १९’च्या रुग्णांचे प्रमाण अधिक आढळून आले आहे,

बाधित क्षेत्र अर्थात ‘कंटेनमेंट झोन’ परिसरात किंवा त्यालगतच्या परिसरात सुरु केलेल्या  या ‘फिव्हर ‘क्लिनिक’मध्ये बाधित रुग्णांच्या इमारतीत किंवा लगतच्या परिसरांमध्ये राहणाऱ्या व्यक्तींची प्राथमिक वैद्यकीय तपासणी करण्यात येत आहे. ‘फिव्हर क्लिनिक’ हे अधिक तीव्रता असलेल्या दाटीवाटीच्या किंवा झोपडपट्टीच्या भागांमध्ये आयोजित करण्यात येतात, तपासणी करण्यात आलेल्या ९१२ नमुन्यांपैकी ५ व्यक्तींचे नमुने बाधित आढळून आले. बाधित व्यक्तींची ही आकडेवारी लक्षात घेतल्यास मुंबईत ‘सामुदायिक संसर्ग’ (कम्युनिटी ट्रान्समिशन) नसल्याचे स्पष्ट असल्याचे महापालिकेने म्हटले आहे.

First Published on: April 16, 2020 5:19 PM
Exit mobile version