त्र्यंबकेश्वरच्या सुफली, मेटघरसह पाच गावांना ईर्शाळवाडीप्रमाणे धोका; ‘इथे’ होणार पुनर्वसन

त्र्यंबकेश्वरच्या सुफली, मेटघरसह पाच गावांना ईर्शाळवाडीप्रमाणे धोका; ‘इथे’ होणार पुनर्वसन

नाशिक : त्र्यंबकेश्वर तालुक्यातील सफलीची वाडी, मेटघरसह पाच गावांना ईर्शाळवाडीप्रमाणे धोका संभवतो. त्यामुळे या गावातील रहीवाश्यांना स्थलांतर करण्याची गरज असून यासंदर्भात सोमवारी वनविभागाच्या कार्यालयात झालेल्या बैठकीत चर्चा करण्यात आली. या चर्चेनुसार या गावांना वनविभागाची दुसरी पर्यायी जागा देण्याचा निर्णय घेण्यात आला. याकरीता ग्रामसभेचा ठराव करून वनहक्क समिती समोर सादर करण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला.

रायगड जिल्हयातील ईर्शाळवाडी येथील दुर्घटनेनंतर नाशिक जिल्हयातील त्रयंबक, सप्तश्रृंगी गडावरील धोकादायक गावांचा मुददा चर्चेत आला. सप्तश्रृंगी गडावरील नागरिकांनी तर थेट मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवत स्थलांतराची मागणी केली. त्याचप्रमाणे त्र्यंबक तालुक्यातील सुफलीची वाडी, गंगाव्दार, पठारवाडी, विनायक मेट, जांबाची वाडी या गावांनाही धोका संभवतो. त्यामुळे या गावांच्या स्थलांतराबाबत पालकमंत्र्यांनी जिल्हा प्रशासनाला निर्देश दिले. त्यानूसार उपविभागीय अधिकारी रविंद्र ठाकरे यांनी या गावांना भेटी देऊन ग्रामस्थांशी चर्चा केली. त्यानुसार गावकर्‍यांनी स्थलांतराची तयारी दर्शवत काही जागा सुचवल्या.

या सर्व जागा या वनविभागाच्या अखत्यारित असल्याने याकरीता वनविभागाची परवानगी आवश्यक आहे. यापार्श्वभुमीवर वनविभागाच्या कार्यालयात सोमवारी बैठक घेण्यात आली. सध्या ही गावे ज्या जागेवर वसलेली आहे ती जागा वनविभागाची आहे. वनहक्क कायद्यानूसार या जागा या कुटुंबांना देण्यात आल्या आहेत. नागरिकांच्या जीविताला धोका लक्षात घेता डोंगराच्या खाली वनविभागाची जागेवर कुटुंबांचे स्थलांतर करून सध्याची जागा वनविभागाने ताब्यात घेण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला.

हा झाला निर्णय

यासंदर्भात एक आठवडयात ग्रामपंचायतीने ठराव करून स्थानिक वनहक्क समितीकडे पाठवावा. स्थानिक समितीने आठवडाभरात हा प्रस्ताव जिल्हा समितीकडे पाठवावा समितीच्या निर्णयानंतर या गावांचे स्थलांतर करण्यात येणार आहे. परंतू तात्पूरत्या स्वरूपात प्रशासनाकडून या रहीवाश्यांच्या स्थलांतरासाठी जागेचा शोध सुरू असल्याचे सांगण्यात आले. यामध्ये सुफलीची वाडी येथील ८१ घरे, गंगाव्दार येथील ५३ घरे, पठारवाडी येथील ५, विनायक मेट येथील १५ तर जाबांची वाडी येथील १६ कुटुंबांचे स्थलांतर करण्यात येणार आहे.

First Published on: July 24, 2023 8:52 PM
Exit mobile version