बाधित कुटुंबियांच्या घरी होणार ‘गणपती बाप्पा मोरया’चा जयघोष!

बाधित कुटुंबियांच्या घरी होणार ‘गणपती बाप्पा मोरया’चा जयघोष!

कोल्हापूरमधील पूरग्रस्तांसाठी जाणार मोफत गणेश मूर्ती

कोल्हापूर जिल्ह्यातील अतिवृष्टी आणि महापुरामुळे स्थानिक भागातील गणेश भक्तांसमोर यंदाचा गणेशोत्सव साजरा करता येणार कि नाही? असा प्रश्न निर्माण झाला होता. याची दखल घेत महसूल तथा कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी कोल्हापूर जिल्ह्यातील कुरुंदवाड येथील कुंभार समाज बांधवांना मोफत ५०० गणेश मूर्ती उपलब्ध करून दिल्या आहेत. या भागात महापुरामुळे अनेक कुटुंबांचे छत्र हरवले. मात्र हा गणेशोत्सव मनोभावे साजरा व्हावा आणि गणेश मूर्ती स्थापनेसाठी अडथळा येऊ नये, म्हणून चंद्रकांत पाटील यांनी याची दखल घेत गणेश मूर्ती उपलब्ध करून देण्याची घोषणा केली होती. यानुसार त्यांनी शुक्रवारी (आज) पहिल्या खेपेत ५०० गणेश मूर्ती उपलब्ध करून दिल्या आहेत.

मशिदींमध्ये बसवतात गणपती!

कोल्हापूरमध्ये आलेल्या महापुरामुळे कुरुंदवाड येथील कुंभार समाजातील बांधवांचे मोठे नुकसान झाले होते. अवघ्या काही दिवसांवर गणेशोत्सव येऊन ठेपलेला असताना, या महापुरात अनेक कुंभार समाजातील मूर्तिकारांच्या गणेश मूर्ती वाहून गेल्या होत्या. कुरुंदवाड शहरात गणेशोत्सवाची मोठी परंपरा आहे. येथील मशिदींमध्ये गणपती बसवण्याची परंपरा शंभरहून अधिक वर्षांपासून सुरू आहे. शहरातील तब्बल सात मशिदींमध्ये हा गणेशोत्सव साजरा केला जातो. या सर्व मशिदींचा परिसर हिंदू-मुस्लिम मिश्र लोकसंख्येचा आहे. गेल्या अनेक वर्षांपासून या भागातील हे नागरिक अत्यंत सलोख्याने हा सण एकत्रितरीत्या साजरा करतात.


हेही वाचा – एफडीएकडून सांगली, कोल्हापूर पूरग्रस्तांना मदत

पूरग्रस्तांना ५०० गणेशमूर्ती देणार

कोल्हापूरमध्ये आलेल्या महापुरानंतर पालकमंत्री चंद्रकांत पाटील हे पूरग्रस्त भागाचा दौरा करत असताना कुरुंदवाड येथील कुंभार समाजातील बांधवांच्या समस्या जाणून घेतल्या. यावेळी स्थानिक ग्रामस्थांनी आपली व्यथा चंद्रकांतदादा यांच्या समोर मांडली. दरम्यान, चंद्रकांत पाटील यांनी येथील कुंभार समाजातील बांधवांना गणेशोत्सवापूर्वी गणेश मूर्ती उपलब्ध करून देण्याची घोषणा केली. या पार्श्वभूमीवर चंद्रकांतदादा पाटील आणि आमदार प्रसाद लाड यांच्या सहकार्याने ५०० गणेश मूर्ती उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. या मूर्ती पेण येथून कुरुंदवाड येथे आणण्यात आल्या आहेत.

First Published on: August 23, 2019 5:42 PM
Exit mobile version