राष्ट्रीय स्वयंसेवक संघावरून जयंत पाटलांचा राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना कानमंत्र; म्हणाले…

राष्ट्रीय स्वयंसेवक संघावरून जयंत पाटलांचा राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना कानमंत्र; म्हणाले…

आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व राजकीय पक्षांनी रणनिती आखण्यास सुरूवात केली आहे. भाजपा, शिवसेना ठाकरे गट, काँग्रेस या पक्षांनी पक्षांअतर्गत बैठकी घेण्यास सुरूवात केली आहे. अशातच राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनीही आपल्या पक्षाला बळकटी देण्यासाठी कार्यकर्त्यांना कानमंत्र दिला आहे. (Follow Rashtriya Swayamsevak Sangh Jayant Patil Appeal To Ncp Workers)

पुण्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्ता मेळाव्यात जयंत पाटील यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला. त्यावेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अनुकरण करा, असा कानमंत्र जयंत पाटील यांनी दिल्याची माहिती समोर येत आहे.

नेमके काय म्हणाले जयंत पाटील?

“राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे 5, 10 लोक रोज सकाळी एकत्र येतात आणि कवायत करतात. आपण रोज नाही पण किमान कार्यकर्त्यांनी प्रत्येक शनिवारी एकत्र यावे. पक्षाची प्रकृती चांगली होईल. पक्ष तंदुरुस्त होईल. पक्षात चर्चा झाली पाहीजे. आपला पक्ष हुकूमशाहीचा नाही लोकशाहीचा आहे. शरद पवार यांनी लोकशाहीला प्राधान्य दिले आहे. संघामध्ये लोकं गोळा होतात आणि चर्चा करतात. मी सांगतो शनिवार हा बजरंग बलीचा वार आहे. त्यामुळे या दिवशी चर्चा करा”, असे जयंत पाटील म्हणाले.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने अहमदनगरला मोठी सभा घेण्याचे प्रयोजित

शिवाजी महाराजांच्या राज्यभिषेकाला 6 जून रोजी तीनशे एकोनपन्नास वर्ष पूर्ण होत आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्यारोहणाचा समारंभ भार्गत वर्षामध्ये पहिल्यांदा एक स्वातंत्र राज्य, स्वाभिमानी राज्य निर्माण करण्याच प्रसंग होता. म्हणून आज सगळा महाराष्ट्रातला मराठी माणूस हा छत्रपती शिवाजी महाराजांना आराध्य दैवत मानतो. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यारोहणाचा सोहळा हा सर्व ठिकाणी साजरा करण्यात येणार आहे. त्यानंतर 10 जूनला महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रसेला 24 वर्ष पूर्ण होऊन 25 व्या वर्षात पक्ष पदार्पण करतो आहे. त्यामुळे अहमदनगरला 10 जूनला रॅली, सभेचे आयोजन करण्यात आले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने अहमदनगरला मोठी सभा घेण्याचे प्रयोजित केले आहे, अशी माहिती जयंत पाटील यांनी दिली.


हेही वाचा – The Kerala Story काल्पनिक, निर्मात्याची सर्वोच्च न्यायालयात कबुली; चित्रपटाच्या सुरुवातीलाच करणार खुलासा

First Published on: May 18, 2023 10:06 PM
Exit mobile version