भंडारा येथे ११५ विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा

भंडारा येथे ११५ विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा

प्रातिनिधिक छायाचित्र

पुण्यातील शिरुर तालुक्यात विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्याची घटना ताजी असतानाच पुन्हा एकदा विषबाधा झाल्याची घटना भंडारा येथे घडल्याचे समोर आले आहे. भंडारा येथे आदिवासी विभागीय क्रीडा स्पर्धेच्या वेळी देण्यात आलेल्या जेवणातून विषबाधा झाल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेमध्ये तब्बल ११५ विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. या स्पर्धेत सहभागी झालेले सर्व विद्यार्थी पूर्व विदर्भातील भंडारा, गोंदिया, नागपूर, गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्यातील आहेत. या विद्यार्थ्यांना भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरु असून विषबाधा झालेल्या विद्यार्थ्यांची संख्ये वाढतच असल्याचे वृत्त समोर आले आहे.

आदिवासी क्रीडा स्पर्धा

भंडारा येथे आदिवासी विकास विभागीय क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. हा कार्यक्रम सकाळी शनिवारी भंडारा येथे आयोजित केला होता. क्रीडा स्पर्धेचे उद्घाटनानंतर विज्ञान प्रदर्शनाची पाहणी करण्यात आली होती. त्यानंतर सर्वच खेळाडू आणि शिक्षकांना जेवण देण्यात आले. जेवण झाल्यानंतर अनेक विद्यार्थी आणि शिक्षकांना अचानक मळमळ, डोकेदुखी आणि उलट्या होण्यास सुरुवात झाली. दुपारी साडेतीन ते चार वाजेपर्यंत जेवण आटोपले. मात्र त्यानंतर देखील विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना त्रास होत असल्याचे समोर आले. या सर्व विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना भंडारा रुग्णलयातील जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले असता त्यांना जेवणातून विषबाधा झाल्याचे उघड झाले आहे.

११५ विद्यार्थ्यांना विषबाधा

या कार्यक्रमाच्यावेळी देण्यात आलेल्या जेवणातून ११५ विद्यार्थ्यांना विषबाधा झाली असल्याची माहिती समोर आली आहे. त्यातील १४ विद्यार्थ्यांवव अजूनही उपचार सुरु असून इतर विद्यार्थी आणि शिक्षकांना प्रथमउपचार करुन जिल्हा क्रीडा संकुलात विश्रांतीसाठी पाठविण्यात आले आहे. तर इतर विद्यार्थी आणि शिक्षकांना प्रथमोपचार करुन जिल्हा क्रीडा संकुलात विश्रांतीसाठी पाठविण्यात आले आहे. रुग्णालयात एकात्मिक प्रकल्प अधिकारी श्रीकृषणनाथ पांचाळ यांनी भेट देत विद्यार्थ्यांची विचारपूस केली आहे.

अपुरी व्यवस्था

आदिवासी विभागीय क्रीडा स्पर्धेसाठी २ हजार ७०० मुलांसह ३०० शिक्षकांनी सहभाग नोंदविला होता. पाच जिल्ह्यातील खेळाडू सहभागी होत असताना जिल्हा क्रीडा संकुलात स्पर्धेचे व्यवस्थापन ढासळ्याचे दिसून आले आहे. सदर विभागीय क्रीडा स्पर्धेची व्यवस्था अपुरी असल्याचे दिसून आले आहे. तसेच यावेळी विद्यार्थ्यांसाठी चटई, गाद्या आणि पाण्याची व्यवस्था अपुरी होती. अन्नातून आणि पाण्यातून विषबाधा झाल्याचे रुग्णालयात दाखल झालेल्या विद्यार्थी आणि शिक्षकांचे म्हणणे आहे. तसेच पिण्यासाठी देण्यात येणारे पाणी संपल्यामुळे जिल्हा क्रीडा संकुलातील जलकुंभाचे पाणी पिण्यासाठी दिले असल्याचे खेळाडूंने यावेळी सांगितले.


वाचा – शिरुरमध्ये ४१ विद्यार्थ्यांना विषबाधा


 

First Published on: December 23, 2018 2:07 PM
Exit mobile version