चलो कुडाळ – पयला बक्षिस मोठो बकरो, दुसरा छोटो बकरो, कोंबो नायतर पेज मिळतलीच!

चलो कुडाळ – पयला बक्षिस मोठो बकरो, दुसरा छोटो बकरो, कोंबो नायतर पेज मिळतलीच!

आतापर्यंत तुम्ही अनेक क्रिकेट सामने पाहीले असतील. त्यात सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या टीमला आयोजक व प्रायोजकांकडून मिळणाऱ्या मोठ्या बक्षिसांबद्दलही तुम्हांला ठाऊक असेल. पण आम्ही तुम्हांला आता अशा एका आगळ्यावेगळ्या सामन्याबद्दल सांगणार आहोत ज्यांची बक्षिस ऐकूनच तुमच्या तोंडाला पाणी सुटेल. कुडाळमधील झारप येथे आजपासून सुरू झालेल्या जय भंडारी चषक २०२० या क्रिकेट सामन्यांमध्ये सर्वोत्तम टीमला मोठा बकरा, द्वितीय येणाऱ्या टीमला छोटा बकरा, तृतीय व चतुर्थ येणाऱ्या टीमला मोठे गावठी कोंबडे, अंडी आणि वार्मअपसाठी प्र्त्येक खेळाडूला तांदळाची पेज देण्यात येणार आहे. आज २२ फेब्रुवारीपासून सुरू झालेले हे सामने २५ तारखेपर्यंत रंगणार आहेत.

यामुळे या सामन्यापेक्षा त्यात खेळाडूंना मिळणाऱ्या बक्षिसांची चर्चाच पंचक्रोशीत सुरू आहे. पाटेकर कला व क्रिडा मंडळ साळगाव व समस्त भंडारी बांधव यांनी आयोजित केलेल्या या जय भंडारी चषक सामन्यांचे हे चौथे वर्ष आहे. आगळ्या वेगळ्या बक्षिसांसाठी हे सामने जरी प्रसिद्ध असले तरी यातून अनेक समाजोपयोगी कार्य मंडळ करत असते. यातून नवोदित खेळाडूंना प्रोत्साहन देण्याबरोबरच त्यांना जगासमोर आणणे हा मंडळाचा मुख्य उद्देश्य आहे. कुडाळवासियांचा मांसाहार हा मुख्य आहार असल्याने खेळाडूंना सामन्याआधी वार्मअपसाठी खास तांदळाच्या पेजेचीही सोय मंडळाने केली आहे. समाजकार्याबरोबरच गरजूंना मदत करणे हा मंडळाचा उद्देश असल्याचे मंडळाचे गोपाळ हळदणकर यांनी सांगितले आहे.

First Published on: February 22, 2020 3:17 PM
Exit mobile version