माजी आमदार संजीवनी रायकर यांचे निधन

माजी आमदार संजीवनी रायकर यांचे निधन

मुंबई : विधान परिषदेत मुंबई शिक्षक मतदारसंघाचे सलग तीनदा प्रतिनिधित्व केलेल्या माजी आमदार संजीवनी रायकर यांचे शनिवारी सकाळी नऊ वाजता निधन झाले. त्यांच्यावर सुश्रुषा रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचार घेत असताना त्यांची प्राणज्योत मालवली.

संजीवनी रायकर यांनी 1980 च्या दशकात शिक्षिका असताना भारतीय जनता पक्षाचे काम सुरू केले. शिक्षकांच्या हक्कांसाठी लढणाऱ्या शिक्षक परिषदेची स्थापना आणि विस्तारात त्यांचा सिंहाचा वाटा होता. 1988, 1994 आणि 2000 साली त्या सलग तीन वेळा मुंबई विभाग शिक्षक मतदारसंघातून विधान परिषदेवर निवडून आल्या.

विधान परिषद सदस्य म्हणून काम करताना तसेच शिक्षक परिषदेमध्ये प्रदेश आणि देशपातळीवर नेतृत्व करताना संजीवनी रायकर यांनी शिक्षकांचे शेकडो प्रश्न सोडविले. शिक्षक परिषदेसोबत वात्सल्य अनाथालयाच्या कार्याला त्यांनी वाहून घेतले होते. विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आदींनी त्यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे.

First Published on: February 5, 2022 8:19 PM
Exit mobile version