महाराष्ट्रातील करोनाग्रस्तांचा आकडा २ हजारांच्या वर; सरकारने मागवले सर्व जिल्ह्यांचे अहवाल

महाराष्ट्रातील करोनाग्रस्तांचा आकडा २ हजारांच्या वर; सरकारने मागवले सर्व जिल्ह्यांचे अहवाल

कोरोना व्हायरस

महाराष्ट्रात दिवसागणीक कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढत आहे. राज्यात नवे ८२ रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे महाराष्ट्रात कोरोनाग्रस्तांचा आकडा हा २ हजार ६४ वर पोहोचला आहे. महाराष्ट्र सरकारच्या आरोग्य विभागाने ही माहिती दिली आहे. या ८२ रुग्णांमधील ५९ रुग्ण हे मुंबइतलेच आहे. राज्यातील वाढती रुग्णसंख्या चिंताजनक आहे. त्यामुळे राज्य सरकारने सर्व जिल्ह्यांचे अहवाल मागवले आहेत. राज्य सरकारने राज्यामध्ये रेड, ऑरेंज आणि ग्रीन झोन तयार करण्याचा निर्णय घेतला आहे. याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रेड, ऑरेंज आणि ग्रीन झोननुसार प्रत्येक जिल्हाधिकाऱ्याकडून अहवाल मागवले असून, या अहवालानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, आरोग्यमंत्री राजेश टोपे, गृहमंत्री अनिल देशमुख आणि उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या सोबत बैठक घेऊन प्रत्येक जिल्ह्याबाबत निर्णय घेणार आहेत.

 

रेड झोन –

मुंबई, पुणे, ठाणे, पालघर, रायगड, नागपूर, औरंगाबाद, सांगली

ऑरेंज झोन –

कोल्हापूर, नाशिक, अहमदनगर, जळगाव, उस्मानाबाद, बीड, जालना, हिंगोली, लातूर, अमरावती, अकोला, यवतमाळ, बुलडाणा, वाशिम, गोंदिया, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा

ग्रीन झोन –

नांदेड, चंद्रपूर, भंडारा, गडचिरोली, धुळे, नंदुरबार, सोलापूर, वर्धा, परभणी

८२ रुग्णांपैकी कुठे किती रुग्ण?

मुंबई – ५९
ठाणे-५
मालेगाव-१२
पुणे-३
वसई-विरार-१
पालघर-२

महाराष्ट्रात कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी लॉकडाऊन ३० एप्रिलपर्यंत वाढवण्यात आला आहे. मुंबई, पुणे, ठाणे, नाशिक ही प्रमुख शहरं रेड झोनमध्ये गेली आहेत. घराबाहेर पडू नका, अगदीच आवश्यकता असेल तर मास्क घातल्याशिवाय बाहेर जाऊ नका, सोशल डिस्टन्सिंग पाळा, भाजीपाला, किराणा घेण्यासाठी गर्दी करु नका, असं आवाहन सरकारने केलं आहे. तसंच तुम्ही खबरदारी घ्या आम्ही जबाबदारी घेतो असंही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.

 

First Published on: April 13, 2020 3:34 PM
Exit mobile version