नासाका चालवण्यासाठी चार कंपन्या रिंगणात

नासाका चालवण्यासाठी चार कंपन्या रिंगणात

नाशिकरोड : नासाका भाडेतत्वावर चालवण्यासाठी राज्य शासनाच्या आदेशा प्रमाणे जिल्हा सहकारी बँकेने निविदा काढली आहे, यात चार कंपन्यांनी सहभाग नोंदविला असून शुक्रवारी (दि.२२) त्यापैकी आर्थिक व तांत्रिक सक्षम असलेल्या कंपनीची निविदा निश्चित होणार असल्याने चार तालुक्यांतील १७ हजार सभासद व कामगारांचे लक्ष लागून आहे.

नाशिक, सिन्नर, ईगतपुरी व त्र्यंबकेश्वर तालुक्यांचे कार्यक्षेत्र असलेला व गेल्या आठ वर्षांपासून बंद असलेला नासाका जिल्हा बँकेने ताब्यात घेतल्यानंतर तो सुरु करण्यासाठी आमदार सरोज आहिरेंनी पाठपुरावा केला होता. त्यांनी सरकारला निविदा काढायला भाग पाडून भाडेतत्वाने चालवण्यासाठी देण्याचे प्रयत्न झाल्यानंतर खासदार हेमंत गोडसे यांनी गेल्या महिन्यात पुढाकार घेत अष्टलक्ष्मी इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीने निविदा भरली होती. सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनी जिल्हा बँकेने काढलेली निविदा प्रक्रिया राज्य शासन व राज्य सहकारी बँकेच्या नियमानुसार नसल्याच्या कारणास्तव रद्द केली होती. त्यावरुन चांगलेच राजकारण तापले होते. मात्र, त्यानंतर पुन्हा निविदा काढण्याचे आदेश दिल्यानंतर सहा कंपन्यांनी सहभाग नोंदविला. मात्र, त्यापैकी एका कंपनीने निविदा शुल्क भरले नाही तर एका कंपनीने रक्कम परवडत नसल्याने थेट माघार घेतली. त्यामुळे चार कंपन्यांनी निविदा सादर केली आहे. त्या चार कंपन्यांत खा. गोडसे यांच्या अष्टलक्ष्मी इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीचा समावेश असून त्यांनी यापूर्वीच अडीच कोटी रुपये जिल्हा बँकेत भरले आहेत. यामुळे चार तालुक्यांतील १७ हजार सभासद व कामगारांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत.

निविदा प्रक्रियेत असलेल्या कंपन्यांची तांत्रिक बाजू तपासल्यानंतर आर्थिक व्यवहाराची क्षमता व आर्हता तपासली जाणार आहे, या दोन्ही गोष्टींमध्ये सक्षम असलेल्या कंपन्यापैकी जास्त दर देणार्‍या कंपनीची निविदा शुक्रवारी (दि.२२) रोजी सायंकाळपर्यंत मंजूर केली जाणार असल्याचे समजते.

First Published on: October 22, 2021 7:16 AM
Exit mobile version