आरोग्य संस्थांसाठी एशियन डेव्हलपमेंट बँकेच्या माध्यमातून निधी

आरोग्य संस्थांसाठी एशियन डेव्हलपमेंट बँकेच्या माध्यमातून निधी

कँसर रुग्णांच्या तुलनेत डॉक्टरांची संख्या अपुरी

राज्यातील आरोग्य संस्थांचे अर्धवट बांधकाम एशियन डेव्हलपमेंट बँकेच्या माध्यमातून जो निधी उपलब्ध होणार आहे त्यातून पूर्ण करण्याचे महत्वाचे काम आरोग्य विभागाने हाती घेतले आहे. ज्या आरोग्य संस्थांचे बांधकाम ७५ टक्के पूर्ण झाले आहे, अशी कामे यावर्षी पूर्ण केली जातील, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी शुक्रवारी विधानसभेत सांगितले.

सदस्य रणजितसिंह पाटील यांनी उस्मानाबाद जिल्ह्यातील शिरढोण ग्रामीण रुग्णालयाच्या इमारत बांधकामाबाबतचा तारांकित प्रश्न विचारला होता. यावेळी झालेल्या चर्चेदरम्यान राज्यातील आरोग्यसंस्थांच्या बांधकामाबाबत सदस्यांनी प्रश्न उपस्थित केले त्याला उत्तर देतांना आरोग्यमंत्री टोपे म्हणाले, राज्यात अनेक ठिकाणी आरोग्य संस्थांचे बांधकाम अपूर्ण आहेत. ती पूर्ण करण्यासाठी सुमारे १३०० कोटी रुपयांची आवश्यकता आहे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी पुढाकार घेऊन एशिअन डेव्हलपमेंट बँकेच्या माध्यमातून यासाठी निधी उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न केले आहेत. हा निधी मिळाल्यानंतर अर्धवट बांधकामे पूर्ण करण्यावर भर दिला जाणार आहे.

तसेच आरोग्य संस्थांमधील रिक्तपदांबाबत माहिती देताना, ही पदे भरण्यासाठी प्रधान सचिवांच्या समितीला अधिकार देण्यात आले आहेत. उपकेंद्रामध्ये आणि प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये कर्मचार्‍यांची जी पदे आहेत ती ग्रामविकास विभागाच्या माध्यमातून भरली जातात. त्यामुळे ही पदे लवकरात लवकर भरावी यासाठी ग्रामविकास विभागाकडे पाठपुरावा केला जाईल. तर आदिवासी विकास विभागात कार्यरत डॉक्टरांना वेतनासोबत विशेष लाभांश देण्याबाबत विचार केला जाईल, असेही आरोग्यमंत्र्यांनी सांगितले. यावेळी झालेल्या चर्चेत सदस्य संग्राम थोपटे, रणधीर सावरकर, माणिकराव कोकाटे, नितेश राणे, शामसुंदर पाटील, देवयानी फरांदे यांनी भाग घेतला.

केंद्राच्या निकषावरच ट्रामा सेंटर
केंद्र शासनाचे निकष आणि राज्यात गठीत केलेल्या समितीच्या शिफारसी या धोरणानुसार राज्यातील आवश्यकता असलेले ट्रॉमा केअर सेंटर पूर्ण केले जातील. भविष्यात अशा सेंटरना या धोरणानुसारच मंजुरी दिली जाईल, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी यावेळी विधानसभेत सांगितले.

First Published on: February 29, 2020 2:26 AM
Exit mobile version