पुरामुळे शहापूरमधील आश्रमशाळेचे भयानक वास्तव उजेडात

पुरामुळे शहापूरमधील आश्रमशाळेचे भयानक वास्तव उजेडात

पुरामुळे भयानक वास्तव उजेडात

नदीच्या पुराचे पाणी वसतीगृहात शिरले पाण्यात वाहत्या प्रवाहात कपडे, दफ्तराच्या पत्र्याच्या पेटया पुरात वाहून गेल्या. उरले सुरलेल्या पेटयां मधील पुस्तके वहया पेन्सील हे सर्व साहित्य भिजलं. कपडे अन्नधान्याची नासाडी झाली. दोन वेळचं अन्न शिजवणारी चुल पुरानं विझली हे भयानक वास्तव आहे ठाणे जिल्हयातील शहापूर तालुक्यातील भातसई येथील गाडगे महाराज आश्रमशाळेचे. पर्जन्यवृष्टी आणि पुरानं या आश्रमशाळेच्या मौल्यवान चिज वस्तुंचे मोठ्या प्रमाणावर अतोनात नुकसान झाल्याचे समोर येत आहे. भातसई गावाजवळ नदी किनारी श्री गाडगे महाराज मिशन मुंबई संचलित या संस्थेची शासकीय अनुदानित १ ली ते १० पर्यंत प्राथमिक आणि माध्यमिक आश्रमशाळा आहे.

या आश्रमशाळेत शहापूर, पडघा, भिवंडी, जव्हार, मोखाडा, खोडाळा, इगतपुरी, घोटी, कसारा या दुर्गम भागातील एकूण ४०० आदिवासी निवासी विद्यार्थी आणि विद्यार्थीनी शिक्षण घेत आहेत. गेल्या आठवड्यात अति पर्जन्यवृष्टीमुळे भातसा नदीला पुर आला होता. पुरआल्यानंतर भातसई गाव आणि नदीच्या अगदी पात्रालगत असलेली ही आश्रमशाळा पुराच्या विळख्यात सापडली. नदीचे पुराचे पाणी थेट आश्रमशाळेतील मुलींच्या वसतीगृहात शिरु लागले. पुराचे पाणी वाढू लागल्याने वेळीच येथील लहान मुला-मुलींना आश्रमशाळा संचालक आणि शिक्षक कर्मचाऱ्यांनी या पुराच्या पाण्यातून कसेबसे बाहेर काढले. तसेच लगत असलेल्या शाळेच्या वर्गखोल्यांच्या एका इमारतीत सुरक्षित ठेवले.

पुरामुळे आश्रमशाळेचे भयानक चित्र

पुर दोन दिवसांनी ओसरला पण आलेल्या भातसा नदीच्या पुराने गरीब आदिवासी मुला-मुलींच्या वसतीगृहाची पार दैना केली. वसतीगृहातील मुलींचे कपडे, पांघरूण, चादरी, इतर साहित्य शालेय वस्तू पाठय पुस्तकांच्या पेटया वाहत्या पुराच्या पाण्यात वाहून गेल्या. उरल्यासुरल्या पेटया पाण्याने भरल्याने यातील पुस्तके, वहया चिंब भिजल्या आणि त्या फाटून गेल्या. पाटी, पेन, पेन्सील, आदी साहित्यांसह धान्य, गहु, तांदुळ, डाळी, कडधान्य, मसाला, हळद, तेल, कांदे-बटाटे भाजीपाला अशा सर्व वस्तुंची पार नासाडी झाली. यातील अनेक वस्तू पाण्याच्या प्रवाहात वाहून गेल्या आहेत. येथे काहीएक उरले नाही असे भयाण चित्र आश्रमशाळेस प्रत्यक्ष भेट दिल्यास नजरेस पडते. पाऊस आणि पुराचं पाणी वसतीगृहातील हॉलमध्ये अध्यापही साठलेलं आहे. यात पुराच्या पाण्यात वाहत आलेले विषारी साप, विंचू, सरडे यांनी देखील प्रवेश केला आहे. यामुळे येथे विषारी सर्पांचा धोका आहेच.

पुराच्या पाण्याने केलेल्या जखमा प्रचंड वेदनादायक

भिजलेल्या वस्तू, पाणी आणि चिखल यांची प्रचंड दुर्गंधी येथे पसरल्याने येथे साफसफाईचं काम आश्रमशाळा कर्मचाऱ्यांकडून सुरु आहे. पुराच्या संकटातून बचावलेल्या मुले अध्यापही भितीच्या छायेखाली आहेत. नदीच्या पुरात आश्रमशाळा वसतीगृह भोजनालयाची दैन्यवस्था झाल्याने पालक आपल्या मुलांना शाळेतून घेऊन घरी गेले आहेत. आरोग्याची काळजी आणि सुरक्षेकरीता या मुलांना काही दिवस सुट्टीच देण्यात आली आहे. ही मुलं ९ ऑगस्टला शाळेत येणार असल्याचे आश्रमशाळा व्यवस्थापनाकडून सांगण्यात आले आहे. जरी येथील पुर ओसरला असला तरी पण पुराच्या पाण्याने केलेल्या जखमा प्रचंड वेदनादायक आहेत. त्या भरतांना वेळ लागेल, अशी भयावह परिस्थिती आश्रमशाळेवर ओढावली आहे. याकडे राज्याच्या आदिवासी विकास विभागाने लक्ष देणं गरजेचं आहे. दरम्यान आश्रमशाळेबाबत आपण काय उपाययोजना केल्या? याची माहिती घेण्यासाठी शहापूर आदिवासी विकास विभागाचे प्रकल्प अधिकारी अरुणकुमार जाधव यांना भ्रमणध्वनीवर संपर्क केला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही.

गाडगे महाराज आश्रमशाळेचे पुरामुळे खुपच नुकसान झाले असून यातून सावरण्यासाठी आम्हाला आता देणगी स्वरुपात मदतीची गरज आहे देणगीदार व,बढे उद्योजक कंपन्या यांनी आम्हला तात्काळ मदत करावी असे आव्हान आम्ही करीत आहोत.
– श्री. भास्कर साठे, संचालक – गाडगे महाराज आश्रमशाळा भातसई
हेही वाचा – कोल्हापुरातून पुराचा काढता पाय, पण संसाराचं काय?
गाडगे महाराज आश्रमशाळेची पुरामुळे झालेली ही दैन्यवस्था पाहता आदिवासी मुलांचे हाल होऊ नयेत त्यांच्या शिक्षणात खंड पडू नये. याकरीता मी शाळेस प्रत्यक्ष भेट देऊन शाळेस मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार आहे.  – शहापूर विधानसभा आमदार पांडुरंग बरोरा
First Published on: August 12, 2019 6:40 PM
Exit mobile version