गायकर यांची माघार, नाशिकमध्ये चौरंगी लढत

गायकर यांची माघार, नाशिकमध्ये चौरंगी लढत

माघारीबाबत बोलताना करण गायकर. समवेत पदाधिकारी.

नाशिक लोकसभा मतदार संघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष करण गायकर यांनी शुक्रवारी, १२ एप्रिलला दुपारी माघार घेतली. त्यामुळे नाशिकमध्ये चौरंगी लढत होणार आहे.

शिवसेनेचे राज्यमंत्री अर्जुन खोतकर, माजी मंत्री बबन घोलप यांची सकाळपासून गायकर यांच्याशी चर्चा सुरू होती. अखेर त्यांची शिष्टाई फलद्रुप झाली. दुपारी १ वाजेच्या सुमारास अपक्ष म्हणून अर्ज भरलेल्या गायकर यांनी माघारीचा अर्ज सादर केला. गायकर यांच्यासोबत भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष सुनील बागुल, खासदार तथा उमेदवार हेमंत गोडसे, बबन घोलप आणि खोतकर एकाच गाडीतून माघारीचा अर्ज सादर करण्यासाठी सोबत आले होते. घोलप आणि खोतकर यांचे निकटचे संबंध असल्याने, गायकर यांच्या मनधरणीसाठी त्यांनी खोतकर यांना बोलावल्याची चर्चा आहे. गायकर यांच्या माघारीमुळे आता नाशिक मतदार संघातून शिवसेना-भाजप युतीचे उमेदवार हेमंत गोडसे, काँग्रेस-राष्ट्रवादीचे उमेदवार माजी खासदार समीर भुजबळ, वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार पवन पवार, अपक्ष उमेदवार माणिकराव कोकाटे यांच्यात चौरंगी लढत होणार आहे.

माझा पाठिंबा गोडसेंना

उमेदवार गोडसे आणि आम्ही नात्यात असल्याने, कुणी एकाने माघार घ्यावी, अशी नातेवाईकांची अपेक्षा होती. दोघेही रिंगणात असलो तर त्यांनी मतदान न करण्याची भूमिका घेतली होती. मंत्री खोतकर, माजी मंत्री बबन घोलप, सुनील बागुल यांच्याशी चर्चेनंतर माघारीचा निर्णय घेतला. माझा पूर्ण पाठिंबा आता गोडसेंना राहणार आहे. – करण गायकर, प्रदेशाध्यक्ष, छावा.

पवन पवारांचे आगमन आणि चर्चेला ऊत

वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार पवन पवार यांचे दुपारी अडीच वाजेच्या सुमारास जिल्हाधिकारी कार्यालयात येताच, ते माघारी घेणार अशी जोरदार चर्चा कार्यकर्त्यांमध्ये रंगली होती. मात्र, पवन पवारांना विचारल्यानंतर आपण केवळ चिन्ह घेण्यासाठी आलो असल्याचे सांगताच चर्चांना पूर्णविराम मिळाला. मी आंबेडकरांचा उमेदवार असल्याने कोणत्याही परिस्थितीत माघार घेणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. कार्यालयातील त्यांच्या अर्ध्या तासाच्या उपस्थितीने राजकीय वर्तुळात मात्र चांगलीच चर्चा रंगली होती.

 

दिंडोरीत तिरंगी लढत

दिंडोरी लोकसभा मतदार संघातून महायुतीच्या भारती पवार, आघाडीचे धनराज महाले आणि माकपचे जे. पी. गावित यांच्यात तिरंगी लढतीची शक्यता आहे.

First Published on: April 12, 2019 1:28 PM
Exit mobile version