गणेशोत्सवासाठी गावाला जायचंय? मग वेटिंगवर थांबा

गणेशोत्सवासाठी गावाला जायचंय? मग वेटिंगवर थांबा

प्रातिनिधिक फोटो

गणेश चतुर्थीच्या दोन दिवस आधीपासून कोकणाकडे रवाना होणाऱ्या विशेष गाडयांचे आरक्षण फुल्ल झाले असून आता प्रवाशांना विशेष अनारक्षित गाड्यांवर अवलंबून राहावे लागणार आहे. तसेच विशेष गाडयांची प्रतीक्षा यादीही ४०० च्या पुढे गेल्यामुळे अनेक चाकरमान्यांना जादा भाडे मोजून बसमार्गे गाव गाठावे लागणार आहे. तर, दुसरीकडे रेल्वे, एसटी बसेस फुल्ल झाल्यामुळे लक्झरी बसेसचेही दर वाढले आहेत. त्यामुळे मुंबईकर चाकरमान्यांमध्ये सध्या नाराजीचं वातावरण पाहायला मिळत आहे.

सर्वच गाड्यांचे आरक्षण फुल्ल

यंदा गणरायाचे आगमन १३ सप्टेंबरला होत असून रेल्वेच्या नियमाप्रमाणे चार महिने आधी आरक्षण करता येते. त्यानुसार, गणेशोत्सवाच्या काळात कोकणात जाणाऱ्या सर्वच गाड्यांचे आरक्षण फुल्ल झाले असून वेटिंग लिस्ट मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्याचबरोबर जनशताब्दी एक्स्प्रेसचे वेंटिग लिस्ट देखील ११०० नंतर बंद करण्यात आले. रेल्वेचे तिकिट मिळाले नाही तर चाकरमानी खासगी ट्रव्हल्सने प्रवास करत असल्याचे निदर्शनास येत आहे.

गणशोत्सव काळातील गाडयांची वेटिंग लिस्ट

गाडी                              ८ सप्टेंबर        ९ सप्टेंबर           १० सप्टेंबर           ११ सप्टेंबर
कोकणकन्या एक्सप्रेस             ३९१            ४०१                ४०२                ५६६
मंगलोर एक्सप्रेस                   ९२              १२१                 १८२               २७६
तुतारी एक्सप्रेस                     २३४             ३८४                ३९८               ६१४
जनशताब्दी एक्सप्रेस                बंद              ३९८                बंद                बंद
मांडवी एक्सप्रेस                     १९७              बंद                 बंद               २९५
तेजस एक्सप्रेस                       –                 –                   ११४                –

खासगी बसचे दर वाढले

याकाळात रेल्वे, एसटी बसेस फुल्ल होत असतानाच लक्झरी बसेसचेही दर वाढू लागल्याने गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या भाविकांमध्ये नाराजी पसरली आहे. दरवर्षी मध्य, कोकण, पश्चिम रेल्वेतर्फे जादा गाड्या सोडण्यात येतात. मात्र, वाढत्या प्रवासी संख्येच्या तुलनेत या गाड्यांची संख्या कमी पडते. दरम्यान, कोकणात जाणाऱ्या साध्या लक्झरी बसेससाठी हंगाम नसतानाच्या कालावधीतील ३०० ते ३५० रुपये आकारले जातात. तेच दर आता ९०० रुपयांवर पोहोचले आहेत.

एसटी महामंडळाकडून २ हजार २२५ बसगाड्या

कोकणात गणेशोत्सवासाठी जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी एसटी महामंडळाकडून २ हजार २२५ बसगाड्या सोडण्यात आल्या आहेत. दरम्यान, यामध्ये ऑनलाइन आरक्षण करण्याची संधी एसटी महामंडळाने दिली असून आतापर्यंत २ हजार बसचे आरक्षण फुल्ल झाले आहेत. एसटी महामंडळाकडून ८ ते १२ सप्टेंबर या कालावधी दरम्यान चाकरमान्यांनी त्याला प्रचंड प्रतिसाद दिल्याने आतापर्यंत २ हजार बसचे आरक्षण फुल झाले. मुंबई विभागातून आजपर्यंत ६११, तर ठाणे विभागातून २२५ गाड्यांची आगाऊ नोंदणी झाल्याचे एसटी महामंडळाकडून सांगण्यात आले आहे.

First Published on: August 27, 2018 7:30 PM
Exit mobile version