दोन दशकात पहिल्यांदाच बाप्पाचे चिडीचूप विसर्जन

दोन दशकात पहिल्यांदाच बाप्पाचे चिडीचूप विसर्जन

मोठी गर्दी घोळके नाही, लाऊडस्पीकर नाही, ध्वनीप्रदुषण नाही, मोठे ढोलपथक किंवा स्पिकरचा कर्कश्श आवाज नाही. पहिल्यांदाच मुंबईतील मोठ्या विसर्जन स्थळांच्या ठिकाणी भयाण अशी शांतता गणेशोत्सवाच्या कालावधीतही यंदाच्या दीड दिवसाच्या गणपतीच्या विसर्जनाच्या निमित्ताने अनुभवायला मिळाली. यंदा गणेशोत्सवाच्या काळातही मुंबईत कोरोनाच्या सावटामुळे अनेक ठिकाणी ध्वनी प्रदुषण टळले गेल्याचे चित्र होते. काही ठिकाणचा अपवाद वगळता यंदाच्या गणेशोत्सवातील मूर्तींचे विसर्जन अतिशय शिस्तबद्ध आणि शांततेत झाल्याचे पहायला मिळाले. याचा फायदा हा मुंबईकरांच्या आरोग्याला होणार असल्याचे आवाज फाऊंडेशनने तयार केलेल्या अहवालात नमुद केले आहे.

यंदाच्या गणेशोत्सव कालावधीत मुंबईत असलेले कोरोनाचे सावट पाहता गणेशोत्सव मंडळांनीही अतिशय सहकार्य केले असून मुंबईकरांच्या आरोग्याच्या दृष्टीने एक पाऊल उचलले आहे. पर्यावरणाच्या दृष्टीने मुंबईकरांनी काळजी घेत यंदा कोरोनाचे संकट पाहून गणेशोत्सवासाठी काळजी घेतली आहे. यापुढच्या गणेशोत्सवाच्या कालावधीतही गणपती मंडळांकडून असेच सहकार्य मिळेल अशी अपेक्षा आवाज फाऊंडेशनच्या सुमेरा अब्दुल्लाली यांनी व्यक्त केली आहे. महत्वाचे म्हणजे कोरोनाच्या संकटातून धडा घेऊन आगामी वर्षांमध्ये येणाऱ्या गणेशोत्सवासाठीही गणपती मंडळे अशीच शिस्त कायम ठेवतील अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे.

यंदा आवाज फाऊंडेशनने मुंबईतल्या अनेक गणेशमूर्ती विसर्जन स्थळांच्या ठिकाणी ध्वनी प्रदुषणाची नोंदणी केली आहे. पण यंदाच्या वर्षातील गणेशमूर्ती विसर्जन हे सर्वात शांततेत पार पडलेले गणपती विसर्जन असल्याचा अहवाल आवाज फाऊंडेशनने जाहीर केला आहे. अनेक गणेशमूर्ती विसर्जनाच्या ठिकाणी गर्दी नव्हती. तसेच कुठेही लाऊडस्पीकर किंवा मोठा आवाज करणाऱ्या वाद्यांचा उपयोग झाला नाही. सर्वाधिक आवाजाची नोंद ही वरळी डेरी येथील गणेशोत्सव विसर्जन मिरवणुकीत झाली. त्याठिकाणी मोठ्या वाद्यांचा वापर करण्यात आल्याने त्याठिकाणचे ध्वनी प्रदुषण हे १००.७ डेसिबल इतके नोंदविण्यात आले. माहीम मच्छीमार कॉलनी तसेच खारदांडा याठिकाणी थोडी गर्दी झाली होती असा अहवालातील उल्लेख आहे. तर वरळीत एका ठिकाणी फटाके फोडण्यात आल्याची नोंद आहे. जवळपास दोन दशकातला हा सर्वाधिक शांततामय असा गणेशमूर्ती विसर्जन सोहळा होता अशी माहिती आवाज फाऊंडेशनच्या संस्थापिका सुमेरा अब्दुल्लाली यांनी दिली. ध्वनी प्रदुषणात झालेली घट ही यंदाच्या वर्षी प्रकर्षाने जाणवली. कोरोना संपुष्टात आल्यानंतरच्या काळातही अशीच शिस्त अपेक्षित आहे असेही त्यांनी सांगितले. येत्या वर्षांमध्येही ध्वनी प्रदुषण कमी होण्यासाठी असाच पुढाकार घेण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. गर्दी करून ध्वनी प्रदुषण न करता उत्सवाचे सेलिब्रेशन व्हायला हवे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

बाप्पा विर्सजनाच्या दिवशी कुठे किती आवाज (डेसिबलमध्ये)

माऊंट मेरी ६५.३
खार दांडा ६८.३
खार जिम ६७.६
जुहू कोळीवाडा ६८.१
जुहू बीच ६४
जुहू तारा रोड ७७.२
शिवाजी पार्क ५३.१
वरळी नाका ६७.६
गिरगाव चौपाटी ६७.५
वरळी डेअरी १००.७
वरळी नाका ९१

 

 

 

 

First Published on: August 24, 2020 2:38 PM
Exit mobile version