सणाच्या निमित्ताने रेशनवर मिळणार साखर, चणा, उडीद डाळ

सणाच्या निमित्ताने रेशनवर मिळणार साखर, चणा, उडीद डाळ

गिरिश बापट

सर्व सामान्यांची दिवाळी गोड व्हावी यासाठी राज्यातील सुमारे १ कोटी २३ लाख प्राधान्य कुटुंबांना प्रती कुटुंब १ किलो साखर २० रुपये दराने वाटप करण्यात येणार आहे. तर, प्रती शिधापत्रिका (रेशनकार्ड) चणाडाळ १ किलो आणि उडीद डाळ १ किलो किंवा दोन्हीपैकी एक डाळ २ किलो याप्रमाणे वितरीत करण्यात येणार असल्याची माहिती अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट यांनी ३१ ऑक्टोबर रोजी झालेल्या पत्रकार परिषदेत दिली. यावेळी गिरीश बापट यांनी सांगितले की, लाभार्थ्यांना नोव्हेंबरच्या अन्नधान्य वाटपासोबत ई-पॉस द्वारे साखर घेता येणार आहे. यासाठी राज्यात ३९ कोटी किंमतीची १ लाख २२ हजार ९४७ क्विंटल साखर उपलब्ध करुन दिली आहे. या वितरण प्रक्रियेत राशन दुकानदारांना १.५० कोटी रुपयांचे कमिशन मिळणार आहे. चणाडाळ प्रतिकिलो ३५ रुपये तसेच उडीदडाळ प्रतिकिलो ४४ रुपये या दराने रेशन दुकानावर उपलब्ध होणार आहे.

एक कोटी कुटुंबियांना याचा लाभ

राज्यात माहे नोव्हेंबर २०१८ पासून अंत्योदय अन्न योजना आणि प्राधान्य कुटुंबातील लाभार्थ्यांना केंद्रशासनाकडून अनुदानित दराने प्राप्त होणाऱ्या चणाडाळ तसेच उडीदडाळीचे वाटप सुरु होणार आहे. राज्यात सुमारे २५ लक्ष अंत्योदय आणि १ कोटी २३ लक्ष प्राधान्य कुटुंबाला याचा लाभ मिळणार असून एकूण ७ कोटी १६ हजार लाभार्थी राज्यभरात आहेत.

धान (भात) खरेदीला सुरुवात

राज्यात सन २०१८-१९ या चालू हंगामात ४५० धान खरेदी केंद्र मंजूर करण्यात आले असून त्यापैकी सद्यस्थितीत ११४ केंद्रावर प्रत्यक्षात धान खरेदी सुरु करण्यात आली आहे, अशी माहिती बापट यांनी दिली. राज्य शासनाने धान उत्पादक शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर राशी म्हणून रुपये २०० प्रति क्विंटल संबंधित शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यावर थेट जमा करण्यात आले आहे. हंगाम २०१६-१७ मध्ये प्रोत्साहनपर राशीसाठी रुपये ६३.५० कोटी तसेच हंगाम २०१७-१८ करिता रुपये ४५.७८ कोटी इतकी रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात थेट जमा करण्यात आली आहे.

शेतकऱ्यांकडून भरडधान्याची खरेदी

विकेंद्रित खरेदी योजनेंतर्गत धान (भात) आणि भरडधान्यांची खरेदी ऑनलाईन पध्दतीने करण्यात येते. हंगाम २०१७-१८ मध्ये सुमारे १ लाख ११ हजार ५६४ इतक्या शेतकऱ्यांकडून धान आणि भरडधान्याची खरेदी करण्यात आली आहे. हंगाम २०१६-१७ मध्ये शेतकऱ्याकडून सुमारे ६१०.३५ कोटी आणि हंगाम २०१७-१८ मध्ये सुमारे ४००.६८ कोटी इतक्या रकमेचे धान खरेदी करण्यात आले आहे.

First Published on: October 31, 2018 8:02 PM
Exit mobile version