प्रकृती खालावल्याने गिरीश बापट पुण्याच्या रुग्णालयात दाखल; काल उतरले होते प्रचारात

प्रकृती खालावल्याने गिरीश बापट पुण्याच्या रुग्णालयात दाखल; काल उतरले होते प्रचारात

भाजप पक्षासाठी कसबा पेठ आणि चिंचवड विधानसभेची पोटनिवडणूक प्रतिष्ठेची बनली आहे. यासाठी भाजपकडून सर्व ताकद पणाला लावण्यात येत आहे. गेल्या काही वर्षांपासून भाजप खासदार गिरीश बापट यांची पक्षाकडून कधीही विचारपूस करण्यात आली नाही. परंतु कसबा पेठ निवडणुकीसाठी प्रकृती अस्वस्थ असताना देखील गिरीश बापट यांना प्रचार करण्यासाठी बोलविण्यात आले. गुरुवारी (ता. 16 फेब्रुवारी) गिरीश बापट हे व्हीलचेअरवर केसरी वाडा येथे कसब्याचे भाजपचे उमेदवार हेमंत रासने यांचा प्रचार करण्यासाठी आणि पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी उपस्थित राहिले होते. परंतु आता त्यांची प्रकृती खालावल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. गिरीश बापट यांना पुण्यातील दीनानाथ मंगेशकर या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

प्रकृती अस्वस्थ असताना देखील गिरीश बापट यांनी पक्षाशी एकनिष्ठ राहत आणि पक्षाप्रती आपले कर्तव्य बजावण्यासाठी पोटनिवडणुकीच्या प्रचाराला हजेरी लावली. यावेळी ते व्हीलचेअरवर आले होते. नाकात ऑक्सिजनची नळी, व्हीलचेअरला ऑक्सिजन सिलेंडर लावून ते केसरी वाडा येथे आले. यावेळी कार्यकर्त्यांशी संवाद साधताना ते दिवंगत आमदार मुक्ता टिळक यांच्या मुद्द्यावरून भावुक झाले. ज्यामुळे त्यावेळी त्याठिकाणी उपस्थित असलेल्या भाजपच्या कार्यकर्त्यांना देखील अश्रू अनावर झाले. यावेळी बोलताना देखील गिरीश बापट यांचे हात थरथरत होते.

दरम्यान, भाजपने स्वतःच्या फायद्यासाठी गिरीश बापट यांना प्रकृती अस्वस्थ असताना देखील बोलावले, असा आरोप विरोधकांकडून करण्यात आला आहे. याआधी गिरीश बापट यांनी प्रकृती ठीक नसल्याने प्रचाराला उपस्थित राहणार नाही, असे पत्र पक्षातील नेत्यांना पाठवले होते. पण गिरीश बापट नाराज असल्याचे त्यावेळी बोलण्यात येत होते. ज्यानंतर देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील आणि चंद्रशेखर बावनकुळे यांनी गिरीश बापट यांची भेट घेतली आणि बापटांना प्रचाराला उपस्थित राहण्यास सांगितले. पण यामुळे आता खरंच गिरीश बापट यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

हेही वाचा – असे खंबीर नेते, असे निष्ठावंत कार्यकर्ते हीच भाजपाची ताकद… गिरीश बापटांसाठी उपमुख्यमंत्र्यांनी केले ट्विट

गेल्या काही महिन्यांपासून गिरीश बापट यांची प्रकृती ठीक नसून त्यांना आठवड्यातून दोनवेळा डायलिसिस करावे लागते. गिरीश बापट हे यामुळे सार्वजनिक ठिकाणी जाणे देखील टाळत असतात. परंतु, त्यांनी पक्षासाठी कसब्याच्या प्रचारात सहभाग घेतला. मात्र त्यामुळे आता गिरीश बापट यांची प्रकृती खालावली आहे. त्यामुळे गिरीश बापट यांना तातडीने पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, आता ते पुन्हा प्रचारात सक्रिय होण्याची शक्यता कमी असल्याचे बोलले जात आहे.

First Published on: February 17, 2023 2:24 PM
Exit mobile version