तीस फूट खोल विहिरीत चिमुरडीने काढली रात्र

तीस फूट खोल विहिरीत चिमुरडीने काढली रात्र

खोल विहीर (फोटो सौजन्य -let hope rise)

खेळताना पाय घसरून पडली
‘देव तारी त्याला कोण मारी’ या म्हणीचा प्रत्यय कन्नड तालुक्यातील देवळणमधील लोकांना आला. गावात १२ जून रोजी संध्याकाळी सहाच्या सुमारास आदिती अनिल सुरासे ही नऊ वर्षांची मुलगी घरातून चहा पिऊन खेळण्यासाठी बाहेर अंगणात गेली. रात्री जेवणाची वेळ झाली म्हणून आई- वडिलांनी आदितीचा शोध घेतला. मात्र, मुलगी न सापडल्याने आपल्या मुलीचे अपहरण झाल्याच्या संशयाने सुरासे कुटुंब प्रचंड घाबरले. त्यानंतर गावकऱ्यांच्या मदतीने मुलीचा शोध सुरू झाला. रात्रभर संपूर्ण गावात, शेतात आजूबाजुच्या परिसरात शोध घेतला तरी मुलगी सापडली नाही. अखेरीस बुधवारी सकाळी ही मुलगी विहिरीत सापडली.
ज्या विहिरीत मुलगी सापडली ती विहीर तीस फूट खोल आहे. यात खेळता खेळता आदिती पाय घसरून पडली. दरम्यान, मुलीच्या आई-वडिलांनी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास देवगाव पोलीस ठाण्यात मुलगी हरवल्याची तक्रारही दिली होती. मुलगी बेपत्ता झाल्याची पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती. त्यानंतर पोलिसांनीही तिचा शोध घेतला. तसेच सोशल मीडियावर मुलीचा फोटो, नाव, गाव इत्यादी माहितीसह शोध घेण्याचे आवाहन करण्यात आले होते. चोरांची अफवा सुरू असल्याने व मुलगी बेपत्ता झाल्याने चोरांनी मुलीचे अपहरण केल्याचा संशय बळावला होता. त्यामुळे उलटसुलट चर्चेला उधान आले होते.

१३ तास अन्न-पाण्याशिवाय
तब्बल तेरा तास अन्न-पाण्यावाचून या नऊ वर्षाच्या मुलीने मोठ्या धाडसाने वेळ काढली. मात्र, तीस फूट खोल विहिरीत पडूनही आदितीला कुठेही जखम न झाल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. तिला मुका मार बसला असून तसेच रात्रभर विहिरीत राहिल्याने ती भेदरली आहे. पुढील उपचारासाठी त्या मुलिला औरंगाबाद मधील दवाखान्यात दाखल करण्यात आले आहे.

First Published on: June 14, 2018 5:32 AM
Exit mobile version