कोरोनाच्या बाधित रुग्णांच्या परिसरांचे जीआयएस मॅपिंग

कोरोनाच्या बाधित रुग्णांच्या परिसरांचे जीआयएस मॅपिंग

मुंबई महानगरपालिका

ज्या भागात ‘कोरोना कोविड १९’ बाधित रुग्ण आढळून आले आहेत, त्या परिसरांचे ‘जीआयएस मॅपिंग’ करण्याची कार्यवाही सुरू करण्यात आली आहे.  ही कार्यवाही झाल्यानंतर महापालिका क्षेत्रातील ज्या परिसरांमध्ये ‘कोरोना’ बाधितांची संख्या अधिक असेल, त्या परिसरांचे नकाशे व संख्यात्मक माहिती महापालिकेच्या संकेतस्थळावर उपलब्ध असतील. जेणेकरून सदर परिसरात राहणाऱ्या नागरिकांना अधिक सजगपणे स्वतःची काळजी घेता येऊ शकेल, तर त्या परिसरात काही आवश्यक कामानिमित्त जाणाऱ्या नागरिकांनाही अधिक सहजपणे प्रतिबंधात्मक उपाय योजना करता येऊ शकेल अशी सूचना महापालिका आयुक्त प्रविणसिंह परदेशी यांनी  सर्व अधिकाऱ्यांना दिले आहेत.

‘कोरोना कोविड १९’ च्या पार्श्वभूमीवर मुंबई महानगरपालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची एक विशेष बैठक महापालिका आयुक्त  प्रवीणसिंह परदेशी यांच्या मार्गदर्शनात महापालिका मुख्यालयात सोमवारी पार पडली. या बैठकीला अतिरिक्त महापालिका आयुक्त, उपायुक्त, महापालिकेच्या वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता, कार्यकारी आरोग्य अधिकारी, संचालक, सहाय्यक आयुक्त, आपत्कालीन व्यवस्थापन कक्षाचे प्रमुख अधिकारी, प्रमुख अग्निशमन अधिकारी आदी वरिष्ठ पदांवरील अधिकारी हे प्रत्यक्षपणे व ‘व्हिडिओ कॉन्फरन्सिंग’द्वारे उपस्थित होते. यावेळी झालेल्या बैठकीत आयुक्तांनी, नागरिकांच्या आरोग्याची काळजी योग्यप्रकारे घेण्याच्या दृष्टीकोनातून उपाययोजना व कार्यवाही करण्याचे निर्देश दिले आहेत.

मुंबईतील सर्वच नागरिकांनी घरामध्येच राहणे व आपली काळजी घेणे आवश्यक आहे.  परंतु, ज्या परिसरात बाधितांची संख्या अधिक असेल, त्या परिसरातील नागरिकांना तुलनेने अधिक काळजी घेणे, अत्यंतिक गरजेचे असल्याचेही त्यांनी सांगितले. ही काळजी नागरिकांना आपापल्या स्तरावर यथायोग्य प्रकारे घेता यावी, त्याचबरोबर प्रशासकीय स्तरावर देखील या अनुषंगाने यथोचित कार्यवाही करणे सुलभ व्हावे, या उद्देशाने याबाबतची माहिती संकेतस्थळाद्वारे सार्वजनिक करण्यात यावी, असेही निर्देश दिले आहेत.

शिकाऊ डॉक्टर, नर्सवर ‘ओपीडी’ची जबाबदारी

आरोग्यविषयक गरजांची भविष्यातील संभाव्यता लक्षात घेउन त्यानुसार आरोग्य विषयक पायाभूत सुविधांचे सक्षमीकरण करणे. तसेच महापालिकेच्या ४ वैद्यकीय महाविद्यालयांमधील अंतिम वर्षाला असणा-या विद्यार्थ्यांना योग्य ते कर्तव्य वाटप करण्याच्या दृष्टीने समन्वयात्मक व व्यवस्थापकीय कार्यवाही करण्यात येत आहे. याच पद्धतीने महापालिकेच्या परिचारिका अर्थात नर्स महाविद्यालयातील दुसऱ्या व तिसऱ्या वर्षाच्या विद्यार्थिनींना देखील कर्तव्य वाटप करण्यात येणार आहे. या विद्यार्थ्यांना प्रमुख्याने दैनंदिन ओ.पी.डी. (बाह्यरुग्ण विभाग) व तत्सम प्राथमिक उपचार विषयक बाबींची जबाबदारी सोपविण्यात यावी. तसेच त्या माध्यमातून त्यांना आवश्यक ते प्रशिक्षण दिले जावे, असेही निर्देश आयुक्तांनी दिले आहेत.

First Published on: March 30, 2020 7:20 PM
Exit mobile version