५० रुपये द्या, रेल्वेत कन्फर्म सीट मिळवा

५० रुपये द्या, रेल्वेत कन्फर्म सीट मिळवा

दादर वरील एक्स्प्रेस ट्रेन

तुम्हाला रेल्वेतून प्रवास करायचा आहे? पण आरक्षण मिळाले नाही. काळजीचे काहीच कारण नाही. खिशात ५० रुपयांची नोट ठेवा. ती दलालाला द्या तो तुम्हाला जनरल डब्यात सीट मिळवून देईल. हे दलाल, रेल्वे सुरक्षा बलाचे जवान आणि रेल्वे प्रशासनाचे रॅकेट गेल्या अनेक वर्षांपासून सुरु आहे. ते मोडण्याचे धाडस अद्याप कोणीही केलेले नाही. रेल्वेच्या जनरल डब्यात या काळात प्रचंड गर्दी होते. याचा फायदा घेऊन सीट पकडून देणारे दलाल आणि चोरटे सक्रिय झाल्याच्या घटना समोर येत आहेत. हा सर्व प्रकार रेल्वे पोलिसांच्या आशिर्वादाने सुरु असल्याचे प्रवाशांचे म्हणने आहे. रेल्वे प्रशासनही या प्रकरांची दखल घेताना दिसत नाही. नुकतेच सीएसएमटी स्थानकावर विदर्भ एक्स्प्रेसमध्ये एका गरीब मजदूर प्रवाशाला दलालाची मदत घेऊन सीट मिळवणे महागात पडले.

प्रवाशांच्याकडून पैसे लुटण्याचे प्रकार सर्रास सुरु

अकोला येथे राहणारे निलेश लाला तांडे आणि त्यांचे मित्र सोमवारी मुंबई गोंदिया एक्स्प्रेसच्या जनरल डब्यात बसले. दलालाला सीट मिळवताना त्यांचे ५ हजार रुपये चोरीला गेले. पोलीसांनी त्यांची तक्रार नोंदवून घेतली नाही उलट त्यांच्यावर फुकटे प्रवासी असल्याचा आरोप करण्यात आला. मुंबईतील रेल्वे स्टेशनवर पाकिट मारण्याच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत. मात्र त्यावर रेल्वे प्रशासनाचा अंकुश नाही. त्याचबरोबर जनरल डब्यातील प्रवाशांना सीट मिळवून देण्याचे आमिष दाखवून दलाल प्रवाशांच्याकडून पैसे लुटण्याचे प्रकार सर्रास सुरु आहेत.

रेल्वे पोलीस आणि दलालांचे लागेबांधे असल्यामुळे दलाल मोकाट आहेत. पोलीस आणि सीट मिळवून देणारे दलाल यांच्यात सेटिंग असल्यामुळे रेल्वेतून प्रवास करणाऱ्या गरिबांना लुटले जाते. याला त्वरित आळा घालणे आवश्यक आहे. रेल्वे प्रशाशनाने याची दखल घेणे आवश्यक आहे.
नागमणी पांडे
सामाजिक कार्यकर्ता

रेल्वेमध्ये वाढत असलेल्या चोरीच्या घटनांवर आम्ही अंकुश लावण्याचा पुरेपुर प्रयत्न करत आहोत. रेल्वेच्या जनरल डब्यात दलाल आढळल्यास आम्ही नेहमीच कारवाई करतो.
– ए.के.जैन.
जनसंपर्क अधिकारी मध्य रेल्वे

 

First Published on: July 2, 2018 3:20 PM
Exit mobile version