दहा रुपयांची ‘शिव भोजन थाळी’ खाण्यासाठी आधार कार्ड, फोटो द्यावा लागणार

दहा रुपयांची ‘शिव भोजन थाळी’ खाण्यासाठी आधार कार्ड, फोटो द्यावा लागणार

आधार कार्ड दिल्यानंतरच मिळणार शिव भोजन थाळी

शिवसेनेने विधानसभा निवडणुकीआधी दहा रुपयात जेवण देऊ अशी घोषणा केली होती. महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर पहिल्या महिन्यातच ‘शिव भोजन थाळी’ ही योजना बनविण्यात आली. तसेच २६ जानेवारी पासून मुंबईतील १५ ठिकाणी ही योजना राबविण्यात येणार आहे. मात्र शिवभोजनाचा आस्वाद घेण्यासाठी ज्या अटी आणि शर्ती पुढे येत आहेत, त्यावरुन या योजनेवर टीका सुरु झाली आहे. तीन महिन्यांपर्यंत दहा रुपयांची थाळी घेण्यासाठी ग्राहकाला आपले आधार कार्ड दाखवावे लागणार आहे, तसेच फोटो देखील द्यावा लागणार आहे. यासंबंधात मुंबई मिररने वृत्त प्रकाशित केले आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी २०१८ च्या दसरा मेळाव्यात दहा रुपयात थाळी देऊ असे आश्वासन दिले होते. सरकार आल्यानंतर आश्वासनाची पुर्तता देखील केली. मात्र योजनेचा लाभ कुणाला द्यायचा? यावरुन सरकार दरबारी संभ्रम आहे. ही योजना गरिब वर्गासाठी आहे. मात्र थाळी घ्यायला येणारा गरिब आहे, हे कसे ओळखायचे? यासाठीच ग्राहकाच्या आधार कार्डची माहिती घेतली जाणार आहे. तसेच राज्य सरकार केंद्रीय माहिती विज्ञान केंद्र (NIC – National Informatics Centre) च्या मदतीने चेहरा स्कॅन करण्याचे सॉफ्टवेअर घेणार आहे. या सॉफ्टवेअरच्या मदतीने ग्राहकाचा चेहरा स्कॅन करुन आधार कार्डाची माहिती जतन केली जाईल. एनआयसी विभाग केंद्रीय माहिती व प्रसारण खात्याच्या अखत्यारित काम करतो.

शिव भोजन थाळी या योजनेची अमलबजावणी करणाऱ्या सार्वजनिक वितरण विभागाच्या अधिकाऱ्यांनी मुंबई मिररशी बोलताना सांगितले की, “आम्ही एनआयसीला सॉफ्टवेअर बनविण्यास सांगितले आहे. ज्यामुळे या योजनेच्या लाभार्थ्यांचा डेटा आम्हाला मिळवता येईल. ही योजना केवळ गरिब वर्गातील जनतेसाठी आहे. तसेच सुरुवातीचे तीन वर्ष प्रायोगिक तत्वावर योजना राबवली जाईल. त्यानंतर गरजेप्रमाणे यात बदल केले जातील.”

दहा रुपयात काय काय मिळणार?

राज्य सरकारने दिलेल्या माहितीनुसार राज्यभरात एका दिवशी १८ हजार थाळ्या देण्यात येणार आहेत. यासाठी सरकारला तीन महिन्यांसाठी ६.४ कोटींचा खर्च येणार आहे. दोन चपात्या, १०० ग्रॅम भाजी, १५० ग्रॅम भात आणि १०० ग्रॅम डाळ असे पदार्थ थाळीत असतील. एका थाळीसाठी कंत्राटदाराला ५० रुपयांचा खर्च येणार आहे, तर राज्य सरकार ४० रुपयांचे अनुदान देणार आहे. अन्न व औषध प्रशासनातर्फे थाळीतील अन्नपदार्थांचा दर्जा वेळोवेळी तपासण्यात येणार आहे.

मनसेची योजनेवर टीका

दहा रुपयांची थाळी देऊन लोकांवर उपकार करत आहात का? हे म्हणजे ‘भिक नको पण कुत्रा आवर’ असे झाले अशी टीका मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी केली आहे. थाळी देतो, पण आधार कार्ड पाहीजे, फोटो स्कॅन करायला पाहीजे – एवढं करायचे असेल तर लोक ही थाळी घेणारच नाहीत, असेही ते म्हणाले.

First Published on: January 22, 2020 11:03 AM
Exit mobile version