केंद्राच्या नावाने शिमगा करा-उद्धव

केंद्राच्या नावाने शिमगा करा-उद्धव

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (संग्रहित छायाचित्र)

शेतकर्‍यांना मी संपूर्ण कर्जमाफीचा शब्द दिला आहे, तो मी पाळणारच. शेतकर्‍यांसाठी केंद्र सरकारकडे मागितलेल्या १५ हजार कोटींच्या मदतीपैकी एकही पैसा अजून आलेला नाही. तेव्हा गोंधळ घालायचा असेल, शिमगा करायचा असेल तो केंद्र सरकारच्या नावाने करा, असा सल्ला देताना तरुणांचे आंदोलन चिरडून देशात पुन्हा एकदा जालियनवाला बाग घडवण्याचा प्रयत्न सुरू आहे, अशी टीका मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली. विधिमंडळाबाहेर मीडियाशी ते बोलत होते.
उद्धव ठाकरे पुढे म्हणाले की, विरोधी पक्षाकडून आज दोन्ही सभागृहांत अवकाळग्रस्त शेतकर्यांच्या मदतीवरून गोंधळ घालण्यात आला. विधिमंडळाची एक परंपरा आहे. अनेक दिग्गजांनी यामध्ये विविध पदे भूषविलेली आहेत. जनतेने निवडून दिलेले लोकप्रतिनिधी इथे आल्यानंतर आपल्या व्यथांना आवाज फोडतील. समस्या मांडून सरकारकडून त्यावर न्याय मिळवून देतील, अशी जनतेची अपेक्षा असते. या सरकारचे हे पहिले अधिवेशन आहे.

मागील दोन अधिवेशनात जे काही झाले त्याचा घटनाक्रम जगासमोर गेला आहे. महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून सत्ताधारी आणि विरोधी पक्ष दोघांना आवाहन करतो की, एका परंपरेचा वारसा लाभलेले हे सभागृह आहे. त्याला काळीमा लागेल असं वर्तन लोकप्रतिनिधींकडून होता कामा नये, असे सांगतानाच विरोधी पक्ष जसे आपण लोकप्रतिनिधी आहात तसेच आम्ही लोकप्रतिनिधी आहोत. व्यथा वेदना मांडा त्यावर आमच्याकडून उत्तरे घ्या. पण जणू काही आपण एकमेव काहीतरी आहोत आणि सत्ताधारी पक्षाला काही पडलेलीच नाही अशा पद्धतीने वर्तन चालू आहे. हे वर्तन निंदनीय आहे, अशी समज उद्धव ठाकरे यांनी दोन्ही पक्षांच्या आमदारांना दिली.

सभागृहात जो शेतकर्‍यांच्या बद्दल प्रश्न उचलला गेला आहे. तो घेऊन गेली २०-२५ वर्षं शिवसेना पक्ष म्हणून आणि या पक्षाचा प्रमुख म्हणून मी स्वत: रस्त्यावर उतरलेलो आहे. मग तो पंतप्रधान पीक योजनेतला घोटाळा असेल, शेतकरी सन्मान योजनेतील अपुरी आलेली मदत असेल, कर्जमुक्ती असेल प्रत्येक वेळी आम्ही रस्त्यावर उतरलो आहे. हे वचन देऊन आम्ही सत्तेवर आलेलो आहोत. लोकांना कळलेलं आहे की वचन मोडल्यानंतर आम्ही कसे वागतो आणि वचन दिल्यानंतर आम्ही कसे वागतो. दिलेले वचन आणि दिलेला शब्द पाळणारे आम्ही आहोत. याची खात्री आता यांना पटल्यामुळे जणू काही आम्ही सरकारला यासाठी भाग पाडत आहोत असा अविर्भाव निर्माण केला जात आहे. पण हे सर्व जनतेला कळते, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

पूरग्रस्तांच्या मदतीसाठी राज्य सरकारने केंद्राकडे ७ हजार कोटींची मदत मागितली आहे. त्याचप्रमाणे अवकाळी पावसासाठीही केंद्राकडे मागणी केलेली आहे. असे सुमारे १५ हजार कोटींची मागणी राज्याने केंद्राकडे केली आहे. केंद्राकडून राज्याला जी मदत येणे आवश्यक होते ती एक पैशाची मदतही आलेली नाही. इथे जे आदळआपट करीत आहेत त्यांच्याच पक्षाचे सरकार केंद्रात आहे. त्यांचेच नेते पंतप्रधान आहेत. शेतकर्‍याबद्दल इथे जे गळा काढताहेत त्यांनी तिकडे जाऊन गळा मोकळा करावा. हवे तर गळा मोकळा करणार्‍या गोळ्या मी देतो, असा टोला उद्धव ठाकरे यांनी लगावला.

दुदैवाने आज देशात अशांततेचे,अस्वस्थतेचे वातावरण निर्माण केले जात आहे. काल ज्या पद्धतीने दिल्लीत कम्पाऊंडमध्ये घुसून विद्यार्थ्यांवर गोळीबार केला गेला ते पाहिल्यानंतर जालीयनवाला बागसारखी परिस्थिती ओढवली की काय काय असे भीतीचे वातावरण युवकांच्या मनात तयार केल जात आहे. मला धास्ती याच गोष्टीची वाटते की ज्या देशात युवक बिथरतो तो देश स्थिर राहू शकत नाही. म्हणून मी केंद्र सरकारला सांगतोय की तुम्ही युवकांना बिथरवू नका. युवक हे देशाचे भावी आधारस्तंभ आहेत, युवक ही आपली शक्ती आहे. पंतप्रधानांच्या भाषणामध्ये लवकरात लवकर २०२१ मध्ये संपूर्ण जगातला हिंदुस्थान हा तरुण देश होणार आहे, असे सांगितले जाते. तेव्हा ही युवाशक्ती म्हणजे युवाबॉम्ब आहे. त्या बॉम्बची वात पेटवण्याचा प्रयत्न केंद्र सरकारने करू नये ही मी केंद्र सरकारला नम्र विनंती करतो

First Published on: December 18, 2019 5:40 AM
Exit mobile version