गोव्याचे माजी आरोग्यमंत्री डॉ सुरेश आमोणकर यांचा कोरोनाने मृत्यू!

गोव्याचे माजी आरोग्यमंत्री डॉ सुरेश आमोणकर यांचा कोरोनाने मृत्यू!

डॉ.सुरेश ओमणकर

गोव्याचे माजी आरोग्य मंत्री आणि भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष डॉ सुरेश आमोणकर याचं कोरोनामुळे निधन झालं आहे. गोव्यात कोरोनाचा आठवा बळी  गेला आहे. डॉ सुरेश आमोणकर यांच्यावर गेल्या काही दिवसांपासून मडगावच्या कोविड रूग्णालयात उपचार सुरू होते. अखेर सायंकाळी त्यांची प्राणज्योत मालवली. मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनीही दुख: व्यक्त केलं आहे.

डॉ सुरेश आमोणकर हे युजीडीपी- भाजप सरकारमध्ये आरोग्य खात्याचे मंत्री होते. याशिवाय भाजपा प्रदेशाध्यक्ष म्हणून त्यांनी काही दिवस काम पाहिलं होतं. ओमणकर हे पाळी (साखळी)  या मतदारसंघाचे आमदार म्हणून १९९९ ते २००२ अशा दोन निवडणूकांवेळी निवडून आले. नंतर ते गोवा सुरक्षा मंचच्या तिकिटावर उभे होते पण पराभूत झाले. २००७ सालच्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार स्व. गुरूदास गवस यांनी त्यांना पराभूत केले. आमोणकर हे आधी फ्रान्सिस सार्दिन यांच्या नेतृत्त्वाखाली आघाडी सरकारमध्ये होते. त्यानंतर ते पर्रीकर मंत्रिमंडळातही होते. त्यावेळी ते आरोग्य खातं सांभाळत होते.

अतिशय शांत, सौम्य स्वभावाचे मंत्री आणि डॉक्टर अशी आमोणकर यांची ओळख होती. आमोणकर यांची मुत्रपिंडे निकामी झाली होती. ते डायलेसिसवर होते. ते खासगी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी जात होते. त्यावेळी त्यांना कोरोनाची लागण झाल्याची शक्यता आहे आणि त्यांचा मृत्यू झाला असं डॉक्टरांचं म्हणणं आहे. त्यांच्या मागे पत्नी आणि दोन मुले असा परिवार आहे.


हे ही वाचा – मुंबईच्या रस्त्यांवर पुन्हा खड्डे दर्शन, पालिकेकडे १२० खड्डयांच्या तक्रारी!


 

First Published on: July 6, 2020 11:24 PM
Exit mobile version