खूशखबर! डाळींचे भाव घसरले

खूशखबर! डाळींचे भाव घसरले

मागील काही दिवसांपासून डाळींच्या भावाने उच्चांक पातळी गाठली होती. मात्र, मुंबई एपीएमसी धान्य मार्केटमध्ये डाळींचे भाव पुन्हा घसरु लागले आहेत. किराणा मालाचे भाव स्थिर असून डाळींचे दर उतरले आहेत. तूरडाळ प्रति किलो २५ ते ३० रुपये, मूगडाळ प्रति किलो ३० ते ४५ किलो, तर हरभरा डाळ प्रति किलो २० ते ३० रुपयांनी खाली आली आहे.

सध्या महाराष्ट्रासह, राजस्थान, मध्य प्रदेश यांसारख्या भागातून मोठ्या प्रमाणात कच्चा माल येत असल्याने डाळींचे उत्पादन वाढत आहे. तसेच, डाळींचे भाव कमी होण्यासदेखील मदत होत आहे. तूरडाळीची वाढलेली आवक आणि हरभरा डाळीला मागणी नसल्याने पंधरा दिवसांत तिन्ही डाळींच्या दरात घसरण झाली आहे. त्यामुळे दिवाळीपासून नवीन वर्षापर्यंत घरोघरी शिजणारी पुरणपोळीची चव गोड झाली आहे. सण आणि उत्सव सुरु झाल्यानंतर बाजारात ग्राहकांची वर्दळ असते. मात्र, ग्राहकही गरजेनुसार वस्तूंची खरेदी करीत असल्याने डाळींची मागणी कमी झाली. त्यामुळे सर्वसामान्य ग्राहकांना दिलासा मिळाला आहे.

गेल्या महिन्यात डाळीच्या दरात विक्रमी भाव वाढ झाल्याने तूरडाळ 100 ते 120 रुपये, मूगडाळ 120 ते 140 किलोवर तर हरभरा डाळ 85 ते 95 रुपये किलोवर पोहोचली होती. ऐन सणासुदीत भाववाढ झाल्याने तिन्ही डाळी खरेदी करण्यासाठी अधिक खिसा हलका करावा लागणार होता. तुरीच्या आयातीसाठी दालमिलला केंद्र सरकारतर्फे देण्यात येणारे परवाने कोरोना काळात तीन महिने थांबवून ठेवल्याने बाजारात तूरडाळीचा तुटवडा निर्माण झाला.

पुरवठा आणि मागणीत बरीच तफावत निर्माण झाल्याने भाववाढ झाली होती. भाववाढीवर नियंत्रण आणण्यासाठी केंद्र सरकारने तुरीची आयात आणि नाफेडच्या साठ्यातून 3.6 लाख टन तूर खुल्या बाजारात विकण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे तुरीच्या भावात प्रतिकिलो 25 रुपयांची घसरण होऊन भाव 9,500 रुपयांवर स्थिरावले. पंधरा दिवसांत तूरडाळ प्रति किलो 25 ते 30 रुपयांनी घसरली. तसेच 120 ते 140 रुपये किलो विकली जाणारी मूगडाळ आता 90 ते 95 रुपये प्रति किलो विकली जात आहे.

सरकार तीन लाख तुरीच्या आयातीसाठी परवाने जारी करणार आहे. परवाने जारी केल्यानंतर आयातीसाठी जवळपास दीड ते दोन महिने लागतील. डिसेंबरअखेर नवीन तूर बाजारात येईल. सरकारच्या निर्णयानंतर भाववाढीवर लगाम लागला. दीड महिन्यात हरभरा डाळीचे भाव क्विंटलमागे 2 हजार रुपयांनी वाढून 75 ते 80 रुपये किलोवर पोहोचले. मात्र, बाजारात ग्राहकांचा अभाव असल्याने हरभरा डाळीच्या दरात प्रति किलो 85 रुपयांवरुन 60-65 रुपयांपर्यंत घसरण झाली. आयातीला प्रोत्साहन देण्यासाठी आयात शुल्क कमी करण्याचा निर्णय सरकारने घेतला. त्यामुळेही दोन्ही डाळींच्या दरात घसरण झाली. दिवाळीसारख्या सणासुदीच्या दिवसांत डाळीच्या दरात घसरण झाल्याने ग्राहकांचे चेहरे फुलले आहेत. परिणामी, गरिबांच्या घरी वरण आणि पुरणाची पोळी शिजणार हे नक्की. त्यामुळे आता सर्वसामान्य नागरिकांना चिंता करण्याची काही गरज नाही, अशी माहिती डाळीचे व्यापारी हर्ष ठक्कर यांनी दिली आहे.

First Published on: November 18, 2020 11:58 PM
Exit mobile version