सिंधुदुर्गात विकेंड लॉकडाऊनला चांगला प्रतिसाद; कणकवलीत पोलिसांचे पेट्रोलिंग

सिंधुदुर्गात विकेंड लॉकडाऊनला चांगला प्रतिसाद; कणकवलीत पोलिसांचे पेट्रोलिंग

सिंधुदुर्गात विकेंड लॉकडाऊनला चांगला प्रतिसाद

महाराष्ट्रात कोरोनाचा धोका वाढत असल्याने राज्य सरकारने शनिवार आणि रविवारी विकेंड लॉकडाऊन लावला. राज्य सरकारने पुकारलेल्या विकेंड लॉकडाऊनला सिंधुदुर्गच्या लोकांनी शनिवारी चांगला प्रतिसाद दिला. अत्यावश्यक सेवा वगळता जिल्ह्यात कडक बंद पाळण्यात आला. नेहमीची गर्दीची ठिकाणे निर्मनुष्य दिसली. शहरी बाजारपेठांमध्ये पोलीस ठिकठिकाणी तैनात असून अत्यावश्यक कामाशिवाय फिरणाऱ्यांवर कारवाई करण्यात येत आहे. ग्रामीण भागातही रस्ते निर्मनुष्य झाले. लोकांनी घरीच थांबणे पसंत केले. सिंधुदुर्गातही गेल्या १० दिवसांपासून कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत असून कोरोनाची साखळी तोडण्यासाठी व्यापाऱ्यांसह लोकांनी लॉकडाऊन पाळून सहकार्य केल्याचे चित्र आहे. जिल्ह्यातील संपूर्ण बाजारपेठांमध्ये काही अत्यावश्यक सेवा वगळता पूर्णतः बंद आहेत. हे विकेंड लॉकडाऊन यशस्वी करण्यासाठी नाक्या-नाक्यावर पोलीस हे वाहनांची कसून तपासणी करत आहेत.

कणकवलीत पोलिसांचे पेट्रोलिंग

कणकवली हा जिल्ह्यातील पहिल्यापासून कोरोनाचा हॉटस्पॉट बनलेला तालुका आहे. सध्या या ठिकाणी दिवसेंदिवस रुग्णसंख्या वाढत आहे. रुग्णसंख्या कमी करण्यासाठी आरोग्य विभाग प्रयत्न करत आहे. दरम्यान, विकेंड लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर कणकवली पोलिस उपविभागीय अधिकारी डॉक्टर नितीन कटेकर व सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर खंडागळे कणकवली शहरातील सर्व भागांमध्ये जाऊन पेट्रोलिंग करत नागरिकांना बाहेर न पडण्याचे आवाहन करत आहेत. या आवाहनाला नागरिकदेखील चांगला प्रतिसाद देताना दिसत आहेत.

विनाकारण फिरणार्‍यांवर पोलिसांची कारवाई

शनिवारी लॉकडाऊन असतानाही विनाकारण फिरणाऱ्यांवर कणकवली पोलिसांनी कारवाई केली आहे. ओळखपत्र तपासूनच प्रत्येक व्यक्तीला त्याच्या अत्यावश्यक कामासाठी सोडले जात आहे. तसेच आज विनाकारण फिरणाऱ्या दोघांना कणकवली पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

First Published on: April 10, 2021 7:11 PM
Exit mobile version