आरोग्यमंत्र्यांचा आणि पदभरतीत घोटाळा करणाऱ्यांचा संबंध काय?, पडळकरांचा सवाल

आरोग्यमंत्र्यांचा आणि पदभरतीत घोटाळा करणाऱ्यांचा संबंध काय?, पडळकरांचा सवाल

आरोग्य विभागाच्या भरती प्रक्रियेतील पेपर फुटीच्या प्रकरणावरुन भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्यावर टीका केली आहे. आरोग्य मंत्र्यांचा आणि घोटाळेबाजाचा संबंध नेमका काय आहे? हे जनतेला कळालं पाहिजे, असं गोपीचंद पडळकर म्हणाले. तसंच, राज्य सरकारने जर याबाबत टाळाटाळ केली तर आम्हीच हा घोटाळा सीबीआयकडे घेऊन जाऊ, असा इशारा देखील त्यांनी महाविकास आघाडीला दिला.

प्रशासनात आपल्याच मर्जीतले-ताटाखालचे अधिकारी बसवायचे. त्यांच्या मार्फत ब्लॅक लिस्टेड कंपन्यांना आरोग्य विभागाच्या पदभरती परीक्षेचं कंत्राट द्यायचं. म्हणजे जेणेकरुन पदभरतीमध्ये वसूलीचा घोडे बाजार चालवण्याची आघाडी सरकारची परंपरा राखता आली पाहिजे. आरोग्यमंत्र्यांचे हे कारनामे आरोग्य विभागाच्या या पदभरती घोटाळ्यामुळं पुराव्यानिशी सिद्ध झालेले आहेत, असं म्हणत हे सरकार आता अधिकृतरित्या वसूली सरकार म्हणून मान्यता प्राप्त झालेलं आहे, अशी टीका केली.

होतकरू विद्यार्थ्यांचा, उमेदवारांचा गळा आवळणाऱ्या घोटाळ्याचे धागे-दोरे थेट मंत्रालयापर्यंत पोहचलेले आहेत. या पेपर फुटीच्या लिंक आरोग्यमंत्र्यांच्या जिल्ह्यापर्यंत जाऊन पोहचल्या आहेत. म्हणजे या सगळ्या घोटाळेबाजीला राज्य सरकारचंच अभय होतं का? असा सवाल महाराष्ट्रातील जनतेच्या मनात उपस्थित होत आहे. आरोग्य मंत्र्यांचा आणि घोटाळेबाजांचा संबंध नेमका काय आहे? हे जनतेला कळालं पाहिजे. कारण हे प्रकरण म्हणजे सगळी यंत्रणाच पोखरलेली आहे, या गंभीर घोटाळ्याची आरोग्य मंत्र्यांसहीत न्यायलयीन चौकशी झालीच पाहिजे, अशी मागणी गोपीचंद पडळकर यांनी केली. तसंच, राज्य सरकारने जर याबाबत टाळाटाळ केली तर आम्हीच हा घोटाळा सीबीआयकडे घेऊन जाऊ, असा इशारा पडळकर यांनी महाविकास आघाडी सरकारला दिला आहे.


हेही वाचा – शेतकऱ्यांना देशोधडीला लावण्याचा ठेका महाविकास आघाडीने घेतलाय; पडळकरांचा वीजतोडणीवरून हल्लाबोल


First Published on: December 10, 2021 3:30 PM
Exit mobile version