शेतकऱ्यांना देशोधडीला लावण्याचा ठेका महाविकास आघाडीने घेतलाय; पडळकरांचा वीजतोडणीवरून हल्लाबोल

शेतकऱ्यांना देशोधडीला लावण्याचा ठेका महाविकास आघाडीने घेतलाय; पडळकरांचा वीजतोडणीवरून हल्लाबोल

महावितरण विभागाने ज्या शेतकऱ्यांनी बिले भरले नाहीत, अशा शेतकऱ्यांची वीज तोडत आहेत. यावरुन भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी महाविकास आघाडी सरकरावर जोरदार हल्लाबोल केला. शेतकऱ्यांना देशोधडीला लावण्याचा ठेका महाविकास आघाडीने घेतलाय, असा घणाघात पडळकर यांनी केला.

पहिल्या पावसाला झालेल्या विलंबनामुळे पेरणीला उशीर झाला.
खरीपाचं पीक तोंडावर असताना आलेलं वादळ आणि ओला दुष्काळ यामुळे शेतकऱ्याचं प्रचंड नुकसान झालं. शेतकऱ्यांवर आलेल्या अस्मानी संकटावर राज्य सरकारने कुठलीही मदत तर केलीच नाही, उलट अनेक ठिकाणी पंचनामेही करायला सरकारी यंत्रणा तयार नव्हत्या. मुख्यमंत्रीही वर्षाच्या बाहेर पडायला तयार नव्हते. अव्वाच्या सव्वा वीजबीलं सक्तीनं वसूल करणं, ऐन कापणीच्या-मळणीच्या वेळेस शेतकऱ्यांना वीजेची गरज असते, नेमकं त्याच वेळेस वीज कनेक्शन तोडणं, असा निजामशाही कारभार या सरकारने चालवला आहे, असा हल्लाबोल पडळकर यांनी महाविकास आघाडीवर केला आहे.

शेतकऱ्यांना देशोधडीला लावण्याचं ठेकाच महाभकास आघाडीनं घेतला आहे. दोन-दोन, चार-चार वर्षामागील वीजबीलं, पंप नसणाऱ्यांनाही अव्वाच्या सव्वा वीजबील देणं, यात अनेक त्रुटी आणि अनियमीतता आहेत. असंख्य शेतकऱ्यांनी पुराव्यांनीशी वीजेच्या बिला संदर्भातील भोंगळ कारभार उघडा पाडला आहे, असं सांगत सरकारने शेतकऱ्यांचा अंत पाहू नये, असा इशारा पडळकर यांनी राज्य सरकारला दिला आहे.

ऐन कापणी हंगामात वीज कनेक्शन तोडणीमुळं झालेल्या नुकसानाचे पंचनामे आपण स्वत: करावे, आपआपल्या कार्यक्षेत्रातील तहसीलदाराकडे ते सुपूर्द करून पोचपावती घ्यावी, असं आवाहन गोपीचंद पडळकर यांनी शेतकऱ्यांना केलं आहे.

First Published on: December 8, 2021 5:26 PM
Exit mobile version