६ दिवसांत राज्यातील ७६ लाख मुलांना गोवर-रुबेलाचं लसीकरण

६ दिवसांत राज्यातील ७६ लाख मुलांना गोवर-रुबेलाचं लसीकरण

गोवर-रुबेला लसीकरण

गोवर आणि रुबेला या आजारांवर प्रतिबंध घालण्यासाठी राज्यात पुन्हा एकदा लसीकरण मोहिम राबवली जात आहे. गोवर आणि रुबेला हा विषाणूजन्य आजार असून अतिशय घातक आहे. त्यावर, नियंत्रण आणण्यासाठी महाराष्ट्र सरकारने प्रयत्न सुरु केले आहेत. त्यामुळे, २७ नोव्हेंबर पासून संपूर्ण राज्यात ‘गोवर- रुबेला’ लसीकरण मोहीम राबवली जात आहे. त्यानुसार, आतापर्यंत राज्यभरात एकूण ७६ लाख मुलांना गोवर- रुबेलाची लस दिली असल्याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री डॉ. दिपक सावंत यांनी दिली आहे. ज्याचं प्रमाण महाराष्ट्रात ३७ टक्के आहे.

वाचा : भारतातील ४२ कोटी मुलांचं होणार गोवर-रुबेला लसीकरण

४ वर्ष वयोगटातील लहान मुलांना लसीकरण

४ डिसेंबरपर्यंत मुंबईतील ९९८ शाळांमधील ३ लाख २२ हजार ३४ मुलांना गोवर-रुबेलाची लस टोचण्यात आली असल्याचं सार्वजनिक आरोग्य विभागाचे संयुक्त आरोग्य संचालक डॉ. संतोष रेवणकर यांनी सांगितलं आहे. या मोहिमेत अंगणवाडी, शाळा आणि घरोघरी जाऊन सहा महिने ते १४ वर्ष वयोगटातील लहान मुलांना लसीकरण केलं जात आहे. गेल्या अनेक वर्षांपासून ही मोहिम सुरू आहे. पण, तरी देखील यंदा विशेष लसीकरण मोहिम हाती घेण्यात आली आहे. वैद्यकीय विभाग, महिला बाल कल्याण आणि आरोग्य विभागाचे अधिकारी एकत्र येऊन ही मोहिम राबवली जात आहे.

वाचा : २७ नोव्हेंबरपासून राज्यात ‘गोवर-रुबेला’ लसीकरण मोहिम

लसीबाबतचे गैरसमज खोटे

गोवर-रूबेलाची जर लस मुलांना दिली तर मुलं नपुंसक होतील अशी अफवा सध्या सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. त्यामुळे, या लसीविषयी कोणतेच गैरसमज न ठेवता आपल्या मुलांना ही लस द्यावी, ज्यामुळे त्यांची प्रतिकारशक्ती वाढेल असं आवाहन आरोग्यमंत्र्यांनी केलं आहे. ही लस मुलांना दिल्यानंतर ४० मिनिटांतच होणाऱ्या परिणामांची लक्षणे दिसून येतात. मुलांना आतापर्यंत फक्त उलट्या आणि ताप येत असल्याच्या तक्रारी येत आहेत. पण, त्याला घाबरुन न जाता त्याचवेळेस या मुलांवर उपचार केले जात असल्याचंही आरोग्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं आहे. महाराष्ट्रातील एकूण ३ कोटी ३६ लाख मुलांना हे लसीकरण करण्याचं उद्दीष्ट आहे.

वाचा : पहिल्याच दिवशी गोवर-रुबेलाचं दहा लाखांहून अधिक बालकांना लसीकरण

First Published on: December 5, 2018 7:20 AM
Exit mobile version