शिशू ते बारावीपर्यंत ऑनलाईन शिक्षण; असे आहे वेळापत्रक

शिशू ते बारावीपर्यंत ऑनलाईन शिक्षण; असे आहे वेळापत्रक

राज्यात कोरोनाच्या भीषण परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर राज्यात थेट शाळा सुरु न करता काही दिवस ऑनलाईन पद्धतीनेच शिक्षण देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतलेला आहे. १५ जूनपासून शैक्षणिक वर्ष सुरू करण्यात आले. मात्र, प्रत्यक्ष शाळा सुरू करणे शक्य नसल्याने राज्य सरकारने ऑनलाईन शिक्षण सुरू करण्याचे निर्देश दिले. यामध्ये शिक्षण विभागाने ऑनलाईन शिक्षणामधून पहिली व दुसरीच्या विद्यार्थ्यांना वगळले होते. मात्र नव्याने जाहीर करण्यात आलेल्या ऑनलाईन वर्गाच्या वेळापत्रकामध्ये पहिली व दुसरीच्या विद्यार्थ्यांसाठीही सोमवार ते शुक्रवार अर्धा तासांची दोन सत्रे ठेवण्यात आली आहेत. तर पूर्व प्राथमिकच्या म्हणजेच छोटा शिशू व मोठा शिशूतील विद्यार्थ्यांच्या पालकांसाठी अर्धा तासाचे सत्र ठेवण्यात आले आहे.

राज्य सरकारने जाहीर केलेल्या ऑनलाईन वर्गाच्या वेळापत्रकामध्ये पहिली व दुसरीतील विद्यार्थ्यांसाठी सोमवार ते शुक्रवार अर्धा तासांची दोन सत्रे ठेवण्यात आली आहेत. यामध्ये १५ मिनिटे पालकांशी संवाद आणि १५ मिनिटे विद्यार्थ्यांना उपक्रम आधारित शिक्षण देण्यात यावे, असे स्पष्ट म्हटले आहे. त्यामुळे आता पहिली व दुसरीच्या विद्यार्थ्यांनाचेही शिक्षकांना ऑनलाईन वर्ग घ्यावे लागणार आहेत. त्याचप्रमाणे पूर्व प्राथमिकमधील विद्यार्थ्यांनाचे सोमवार ते शुक्रवारपर्यंत दररोज अर्धा तास ऑनलाईन वर्ग घेऊन पालकांशी संवाद साधून त्यांना मार्गदर्शन करायचे आहे. तिसरी ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना सोमवार ते शुक्रवारपर्यंत प्रत्येक दिवशी ४५ मिनिटांची दोन सत्रे तर नववी ते बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना ४५ मिनिटांची चार सत्रे ऑनलाईन घ्यावीत अशा सूचना शिक्षण विभागाकडून जाहीर करण्यात आल्या आहेत.

 

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील शाळा प्रत्यक्षात सुरू करणे शक्य नाही. त्यामुळे १५ जूनपासून शैक्षणिक वर्ष सुरू करत स्थानिक परिस्थितीनुसार शाळा सुरू करण्याचा निर्णय संबंधित जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त आणि शाळा समितीवर सोपवण्यात आला होता. त्याचबरोबर इयत्ता पहिली ते बारावीपर्यंतचे वर्ग सुरू करण्याबाबतची अंदाजे तारखाही शिक्षण विभागाकडून शाळांना देत ऑनलाईन वर्ग सुरू करण्याचे निर्देश दिले होते. ऑनलाईन वर्ग घेण्याबाबत आता राज्य सरकारने ऑनलाईन वर्गाचे वेळापत्रकही जाहीर केले आहे.

First Published on: July 23, 2020 7:08 PM
Exit mobile version