फडणवीसांच्या तिन्ही मागण्या महत्त्वाच्या, त्याबाबत कार्यवाही करा; राज्यपालांचं मुख्यमंत्र्यांना पत्र

फडणवीसांच्या तिन्ही मागण्या महत्त्वाच्या, त्याबाबत कार्यवाही करा; राज्यपालांचं मुख्यमंत्र्यांना पत्र

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना विधानसभा अध्यक्षाची निवडीची आठवण करुन दिली आहे. येत्या ५ आणि ६ जुलै रोजी विधीमंडळाचं पावसाळी अधिवेशन होत आहे. त्या पार्श्वभूमीवर विधानसभा अध्यक्षाची निवड करण्यास सांगितलं आहे. यासंदर्भात राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं आहे. विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या तिन्ही मागण्या महत्त्वाच्या असून त्याबाबत कार्यवाही करुन त्यासंदर्भातील माहिती द्यावी असं सांगितलं आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी काही दिवसांपूर्वी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली होती. यावेळी त्यांनी काही मागण्या केल्या होत्या. त्यामध्ये विधानसभा अध्यक्षाची निवडणूक, पावसाळी अधिवेशनाचा कालावधी वाढवणे आणि ओबीसी आरक्षण रद्द झाल्याने स्थानिक संस्थांच्या निवडणुका घेऊ नये, अशा मागण्या होत्या. त्या मागण्यांच्या अनुषंगाने आज राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं आहे. या पत्रामध्ये त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या मागण्या महत्त्वाच्या असून योग्य ती कार्यवाही करुन त्याबाबत माहिती द्यावी असे निर्देश राज्यपालांनी दिले आहेत.

काय म्हटलंय पत्रात?

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचं शिष्टमंडळ २३ जून रोजी मला भेटलं. त्यांनी दोन निवेदने मला दिली आहेत. त्यामध्ये त्यांनी विधानसभा अधिवेशनाचा कालावधी वाढवणे, विधानसभा अध्यक्षांची निवड आणि ओबीसी आरक्षण प्रलंबित असल्याने जिल्हा परिषद निवडणुका स्थगित करा, या मागण्या केल्या आहेत. हे तीनही विषय महत्त्वाचे आहेत. त्यावर योग्य कारवाई करुन, याबाबत मला कळवा, असं राज्यपालांनी आपल्या पत्रात म्हटलं आहे.

 

First Published on: June 30, 2021 1:39 PM
Exit mobile version