कोरोनामुळे विधान परिषद सदस्य नियुक्तीस राज्यपालांचा नकार?

कोरोनामुळे विधान परिषद सदस्य नियुक्तीस राज्यपालांचा नकार?

विधान परिषदेतील रिक्त झालेल्या १२ राज्यपाल नियुक्त सदस्यांच्या नियुक्त्या दोन महिने लांबणीवर पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. राज्यातील सध्याची कोरोनाची परिस्थिती पाहता पुढील दोन महिने यासंदर्भात नावांची शिफारस करू नका, अशा स्पष्ट सूचना राज्यपालांनी दिल्या असल्याचे समजते. तर येत्या पावसाळी अधिवेशनापूर्वी राज्यपाल नियुक्त सदस्यांच्या नियुक्त्या करण्यात याव्यात यासाठी महाविकास आघाडीचे नेते आग्रही आहेत.

६ जून रोजी १० तर १५ जून रोजी दोन असे एकूण १२ विधान परिषदेतील राज्यपाल नियुक्त सदस्यांची मुदत संपली आहे. सुमारे एक महिन्याचा कालावधी उलटूनही या रिक्त झालेल्या जागेवर राज्य सरकारकडून अजून कोणाच्याही नावाची शिफारस करण्यात आलेली नाही. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे या सदस्यांची नियुक्ती करताना निकषाचे काटेकोरपणे पालन करणार असल्याचे गृहीत धरून महाविकास आघाडीकडून नावांची शिफारस करण्यात आलेली नसल्याचे समजते. राज्यातील सध्याची कोरोनाची परिस्थिती पाहता विधान परिषदेतील रिक्त जागांसाठी पुढील दोन महिने तरी नावांची शिफारस करू नका, अशा सूचना राज्यपालांकडून दिल्या असल्याचे सांगण्यात येते. राज्य विधी मंडळाचे पावसाळी अधिवेशन ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात सुरू होणार असल्याने या नियुक्त्या त्यापूर्वी करण्यासाठी महाविकास आघाडीचे नेते आग्रही आहेत.

या नियुक्त्यांच्या वेळकाढूपणाविषयी शिवसेना नेते खा.संजय राऊत यांनी शंका उपस्थित केली होती. राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार येत्या ऑक्टोबर महिन्यापर्यंत कोसळेल अशी भाजप नेत्यांची अपेक्षा आहे. त्यामुळेच राज्यपाल नियुक्त सदस्यांची नियुक्त्या लांबणीवर टाकण्यात आल्या आहेत. आपले सरकार आले की आपल्या मर्जीतील लोकांची वर्णी विधान परिषदेवर लावता येईल, असे मनसुबे भाजप रचत असल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला होता. तर लांबणीवर पडलेल्या विधान परिषदेतील १२ राज्यपाल नियुक्त सदस्यांच्या नियुक्त्यांसाठी महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठक बाळासाहेब ठाकरे स्मारकात पार पडल्याची चर्चा आहे. १२ राज्यपाल नियुक्त सदस्यांची नियुक्ती तातडीने व्हावी, यासाठी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे आग्रह धरण्याचे या बैठकीत निश्चित झाल्याचे समजते. यासाठी पत्रव्यवहार करण्याबरोबरच वेळ पडली तर न्यायालयात जाण्याची तयारी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केल्याचे सांगितले जात आहे.

या बैठकीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, शिवसेना नेते एकनाथ शिंदे, गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड आणि आदित्य ठाकरे उपस्थिती होते. राज्यपालांनी या प्रक्रियेसाठी वाट पाहण्याची भूमिका घेतली असली तरी या नियुक्त्यांसाठी उशीर होत असल्याने राज्य सरकार यासाठी राज्यपालांना विनंती करणार असल्याचे समजते. महाविकास आघाडीत राज्यपाल नियुक्त सदस्यांच्या १२ जागांच्या वाटपाचा फॉर्म्युला अद्याप निश्चित झाला नसला तरी शिवसेना आणि काँग्रेसने प्रत्येकी ५ जागांची मागणी केली असल्याचे सांगण्यात येते. नुकत्याच झालेल्या विधानपरिषद निवडणुकीत काँग्रेसने २ जागांचा आग्रह धरला असतानाही त्यांना एका जागेवर समाधान मानावे लागले होते. त्यामुळे काँग्रेसने पाच जागांचा आग्रह धरला आहे. तर या नियुक्त्या करताना तीनही पक्षांना समसमान वाटप व्हावे, ही भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसने घेतली असल्याची चर्चा आहे.

First Published on: July 15, 2020 7:11 AM
Exit mobile version