पोलीस ठाण्याच्या समोरच पोलीस कर्मचाऱ्याला बेदम मारहाण

पोलीस ठाण्याच्या समोरच पोलीस कर्मचाऱ्याला बेदम मारहाण

पोलीस कर्मचाऱ्याला मारहाण

पिंपरी-चिंचवडच्या वाकड पोलिस ठाण्यासमोरच पोलिसांना बेदम मारहाण झाल्याची घटना घडली आहे. वाकड पोलीस ठाण्याच्या अवघ्या वीस मीटर अंतरावर महिलेचे नाव शौचालयात लिहिल्यावरून दोन गटात धारदार शस्त्रासह भांडण सुरू होते. तेव्हा वाकड पोलिसांनी धाव घेत भांडण सोडवण्याचा प्रयत्न केला. मात्र काही आरोपींनी कोयत्याचा धाक दाखवत काठीने मारहाण करत पोलिसांना जखमी केले आहे. या घटनेत पोलीस हवालदार प्रमोद भांडवलकर हे गंभीर जखमी झाले असून त्यांचा उजवा पाय जायबंदी झाला आहे. दरम्यान याप्रकरणी पाच जणांना ताब्यात घेतले असून २२ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हे वाचा – पोलीस निरीक्षकाला धमकावून महिला पोलिसांना मारहाण

याप्रकरणी साजन सुभाष सुकळे, सुभाष रामा सुकळे, लहू बापू सुकळे, अनिल अण्णा सुकळे, शिवाजी बापू सुकळे यांना वाकड पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सविस्तर माहिती अशी की, वाकड पोलिस ठाण्याच्या समोर अवघ्या वीस मीटर अंतरावर दोन गटात कोयता आणि काठी घेऊन भांडण सुरू होते. हा सर्व प्रकार पोलीस ठाण्यासमोर होत असल्याने याची माहिती पोलिसांना मिळाली. फिर्यादी पोलीस नाईक व्ही. एस. कुदळ, जखमी प्रमोद भांडवलकर आणि इतर पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र भांडण सोडवण्यासाठी गेले असता यातील काही आरोपींनी भांडलवकर यांना कोयत्याचा धाक दाखवत एकाने उजव्या पायावर काठीने जोरात मारले यात भांडवलकर हे गंभीर जखमी झाले असून इतर पोलीस कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की झाली.

याप्रकरणी उशिरा वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस नाईक व्ही.एस. कुदळ यांनी फिर्याद दिली आहे. दरम्यान गेल्या काही महिण्यापासून पोलीस कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की आणि मारहाणीच्या घटनेत वाढ झाली आहे.


हे देखील वाचा – पिंपरी चिंचवडमध्ये पोलीस ठाण्यातच पोलिस कर्मचाऱ्याला शिवीगाळ!

First Published on: January 11, 2019 10:27 AM
Exit mobile version