कोकण आपत्ती व्यवस्थापन अंतर्गत सिंधुदुर्गासाठी १ हजार ४९९ कोटी – पालकमंत्री उदय सामंत

कोकण आपत्ती व्यवस्थापन अंतर्गत सिंधुदुर्गासाठी १ हजार ४९९ कोटी – पालकमंत्री उदय सामंत

कोकणामध्ये “कोकण आपत्ती व्यवस्थापन कार्यक्रम” राबविण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला असून कोकण आपत्ती व्यवस्थापन अंतर्गत मंजूर करण्यात आलेल्या ३ हजार २०० कोटी निधीपैकी १४९९ कोटी रुपये सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी मंजूर झाल्याची माहिती पालकमंत्री उदय सामंत यानी आज पत्रकार परिषदेत दिली. धूप प्रतिबंधक बंधारे, भूमिगत विद्युत वाहीन्या, शेल्टर हाऊस, आपत्ती पूर्व सूचना यंत्रणा, विज अटकाव यंत्रणा, दरड प्रवण क्षेत्र संरक्षण इत्यादी बाबी वर हा निधी खर्च करण्यात येणार आहे.

तौक्ते चक्रीवादळामुळे किनारपट्टीवरील जिल्ह्यात झालेले नुकसान विचारात घेवून कोकण आपत्ती सौम्यीकरण प्रकल्प या नावाने कोकणासाठी हा विशेष कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. या प्रकल्पांतर्गत सुमारे ३ हजार २०० कोटी पैकी २ हजार कोटी रुपये राज्य आपत्ती सौम्यीकरण निधीतून खर्च करण्यास आणि उर्वरित १२०० कोटी रुपये पुढील ४ वर्षात (सन २०२२-२५) राज्याच्या निधीतून उपलब्ध करुन देण्यास मान्यता देण्यात आली.
या प्रकल्पात क्षमता बांधणी आणि पूर्वतयारी तसेच सौम्यीकरण निधीचा योग्य व सर्वसमावेशक वापरासाठी ४ वर्षासाठी बृहत आराखडा तयार करण्यात येणार आहे. व त्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी प्रकल्प संनियंत्रण गट (Project Monitoring Unit) व सल्लागारांची नियुक्ती करण्यात येईल.

चार वर्षाच्या या आपत कालीन यंत्रणा सुधारणा कार्यक्रमात धूप प्रतिबंधक बंधारयासाठी जिल्ह्याला ४००.७० कोटी, भूमीगत विद्युत वाहीन्या साठी १०५७ कोटी, पूर प्रवण क्षेत्रातील नागरिकांच्या स्थलांतर व शेल्टर हाउस साठी १७.५३ कोटी, आपातकालीन धोक्याची पूर्वसूचना देणाऱ्या यंत्रणेसाठी २३ लाख, तर विज अटकाव यंत्रणा उभरण्यासाठी १ कोटी ६७ लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत. आपातकालीन परिस्थिती नंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टिका करणाऱ्या विरोधकांच्या टिकेला विकासात्मक निधितून हे दिलेले उत्तर आहे अशी टिप्पणी पालकमंत्री उदय सामंत यानी यावेळी बोलताना दिली .

 

First Published on: September 16, 2021 9:46 PM
Exit mobile version