Gudi Padwa 2024 : आडवा येईल, त्याला आडवा करून गुढी पाडवा साजरा करू – मुख्यमंत्री शिंदे

Gudi Padwa 2024 : आडवा येईल, त्याला आडवा करून गुढी पाडवा साजरा करू – मुख्यमंत्री शिंदे

ठाणे : ठाणे आणि परिसरात आज, मंगळवारी गुढीपाडवा नववर्षाच्या स्वागताचा उत्साह दिसत आहे. ठाण्यात श्री कौपिनेश्वर सांस्कृतिक न्यास मंदिर संस्थेच्यावतीने सकाळी शोभायात्रा काढण्यात आली होती. त्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सहभागी झाले होते. त्यांनी राज्यातील तमाम जनतेला नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या. तसेच, राज्य प्रगतीपथावर असल्याचा दावा त्यांनी केला. तसेच, या विकासात, प्रगतीत जो आडवा येईल, त्याला आडवा करून गुढी पाडवा साजरा करण्यात येईल, असा इशारा त्यांनी विरोधकांना दिला आहे. (Gudi Padwa 2024: Chief Minister Shinde’s warning to those who obstruct the development of the state)

लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्यी फैरी झ़डत आहेत. या पार्श्वभूमीवर ठाण्यात कोपिनेश्वर मंदिर ट्रस्टच्या वतीने आयोजित स्वागतयात्रेत सहभागी झालेल्या मुख्यमंत्री शिंदे यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. मागील सरकारने सर्व सणउत्सव तसेच विकासकामांवर बंधने घातली होती. पण राज्यात सत्तांतर झाले आणि आमचे सरकार आल्यावर आम्ही ही सर्व बंधने दूर केली. त्यामुळे सर्व सणांमध्ये राज्यभरात उत्साह पाहायला मिळत आहे. सरकार बदलल्यामुळे व्यापाऱ्यांपासून शेतकरी, कष्टकरी मोकळा श्वास घेत आहेत, असे सांगत एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला.

चंद्रपूरमधील भाजपा उमेदवार सुधीर मुनगंटीवार आणि गडचिरोली-चिमूरमधील भाजपा उमेदवार अशोक नेते यांच्या प्रचाराच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची काल, सोमवारी चंद्रपुरात जाहीर सभा पार पडली. या सभेत मोदी यांनी काँग्रेससह महाविकास आघाडीवर जोरदार टीका केली. काँग्रेसला लक्ष्य करताना मोदी यांनी मराठी म्हणीचा वापर केला. कडू कारले तुपात तळले, साखरेत घोळले, तरी कडू ते कडूच… ही म्हण काँग्रेसला लागू होते. कारण ते कधीही सुधारणार नाही आणि बदलणार नाही, असे टीकास्त्र मोदींनी डागले.

हाच संदर्भ देत एकनाथ शिंदे म्हणाले, चंद्रपूरमध्ये कालच (सोमवारी) गुढी पाडवा साजरा झाला. पंतप्रधान मोदी यांच्या सभेला लोकांचा तुफान प्रतिसाद लाभला. सर्वत्र मोदीमय वातावरण होते. मोदी यांचे काम लोकांपर्यंत पोहोचत असून याच कामाची पोहोचपावती प्रत्येक सभेतून लोक देत आहेत. आता तिसऱ्या वेळीही नरेंद्र मोदी यांनाच पंतप्रधान बनवण्याची गॅरंटी लोकांनी घेतली आहे, असे सांगून, 4 जूनला याच विजयाचा आम्ही गुढीपाडवा साजरा करू, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.

First Published on: April 9, 2024 7:59 AM
Exit mobile version