H3N2 वर आपल्याकडे औषध नाही; आरोग्यमंत्र्यांची माहिती

H3N2 वर आपल्याकडे औषध नाही; आरोग्यमंत्र्यांची माहिती

देशात सध्या नव्या व्हायरसची साथ पसरली असून इतर राज्यांप्रमाणेच आता महाराष्ट्रातही आपलं डोकं वर काढू लागलाय. H3N2 हा नवा विषाणू आता महाराष्ट्रातही फैलावत असून आतापर्यंत तीन जणांचा मृत्यू झाला आहे. याची दखल राज्य सरकारने घेतली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नुकतीच संसर्गजन्य H3N2 ची आढावा बैठक घेऊन नवे आदेश दिले आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज H3N2 संसर्गाबाबत बैठक घेतली आहे. या बैठकीला आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्यासह आरोग्य विभागातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. या बैठकीत कोविड / H3N2 हे दोन्ही संसर्गजन्य असून दोघांचीही लक्षणही सारखी असल्याचं सांगण्यात आलं. कोविड काळात उभी करण्यात आलेली यंत्रणा ही पुन्हा अॅक्टीव्ह करण्याच्या सूचना या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत. तसंच, गर्दीच्या ठिकाणी शक्यतो मास्क वापरण्याचे आवाहन करण्याबाबत सूचना सुद्धा देण्यात आलेल्या आहेत.

आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत यांनी सुद्धा या नव्या विषाणूबाबत माहिती दिली आहे. 15 पेक्षा कमी आणि 50 पेक्षा जास्त वयोगटातील लोकांना याची लागण होत असल्याचा निष्कर्ष समोर आली आहे. या व्हायरसमध्ये सतत खोकला आणि ताप अशी लक्षणं जाणवत आहेत. इतर फ्लूंच्या तुलनेत या H3N2 मुळे रुग्णालयात दाखल होणाऱ्यांची संख्या अधिक असल्याचं सांगितलं आहे. लागण झालेल्यांना खोकला आणि तापासह सर्दी, मळमळ, अंगदुखी, उलट्या अशी लक्षणंही जाणवत आहेत. दरम्यान, हा आजार जीवघेणा नसल्याचं स्पष्ट केलं आहे.

देशात पसरत असलेल्या या नव्या व्हायरसवर कोणतंही औषध आपल्याकडे उपलब्ध नसल्याचं यावेळी आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत यांनी सांगितलं. गेल्या काही आठवड्यांपासून H3N2 चे रुग्ण वाढले आहेत. 100 हून अधिक चाचण्या करण्यात आल्या असता त्यात अनेकजण पॉझिटिव्ह आढळले आहेत. दरम्यान आयएमएच्या स्थायी समितीने दिलेल्या माहितीनुसार, हा ताप तीन दिवसांनी जातो, तर खोकला मात्र तीन आठवडय़ांपर्यंत राहू शकतो.
लोकांना नियमित हात धुण्याचा तसंच सार्वजनिक ठिकाणी न थुंकण्याचा सल्ला देण्यात आला आहे. तसंच लक्षणं जाणवत असल्यास मास्क घालणं, गर्दीच्या ठिकाणी न जाणं, खोकताना आणि शिंकताना तोंडावर हात ठेवणं, डोळे आणि नाकाला स्पर्श न करणं असे सल्ले देण्यात आले आहेत. ताप आणि अंगदुखी असल्यास पॅरासिटामॉल घेण्यास सांगण्यात आलं आहे.

First Published on: March 17, 2023 3:52 PM
Exit mobile version