आरोग्य विभागाच्या २४ ऑक्टोबरला परीक्षा

आरोग्य विभागाच्या २४ ऑक्टोबरला परीक्षा

नाशिक – दोन वेळा रद्द झालेल्या आरोग्य विभागाच्या भरती परीक्षा २४ ऑक्टोबर रोजी होणार आहेत. राज्य स्तरावरील २४ आणि मंडळ स्तरावरील २८ अशा एकूण ५२ संवर्गासाठी भरती परीक्षा होणार आहे. २ हजार ७३९ रिक्त पदांसाठी ही परीक्षा होत असून, त्यासाठी ४ लाख ५ हजार १५६ अर्ज प्राप्त झाले आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने आरोग्य विभागात १०० टक्के रिक्त पदे भरण्याची परवानगी दिली आहे. ही परीक्षा न्यास एजन्सीमार्फत घेतली जात असल्याची माहिती सार्वजनिक आरोग्य विभागाच्या संचालक डॉ. अर्चना पाटील यांनी दिली.

सार्वजनिक आरोग्य विभागातील आयुक्तालय आरोग्य सेवा अंतर्गत गट ‘क’ व ‘ड’ पदभरती संदर्भात येत असलेल्या विविध शंका व उलट-सुलट बातम्यांच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक आरोग्य विभागाच्या संचालक डॉ. अर्चना पाटील यांनी आरोग्य उपसंचालक कार्यालयात पत्रकार परिषद घेत परीक्षा नियोजनाबाबत माहिती दिली.

डॉ. पाटील पुढे म्हणाल्या की, आरोग्य विभागाने भरती प्रक्रिया राबवण्यासाठी मे. न्यास कम्युनिकेशन्स यांची नेमणूक केली आहे. शासनाच्या परवानगीनुसार गट ‘क’ मधील ५२ संवर्गातील २७३९ रिक्त पदे भरण्यासाठी ५ ऑगस्ट २०२१ रोजी जाहिरात प्रसिद्ध केली होती. त्यास अनुसरून ४ लाख ५ हजार १६३ अर्ज प्राप्त झाले. याबाबतची परीक्षा २४ ऑक्टोबरला घेतली जाणार आहे. राज्य स्तरावरील संवर्गाचे नेमणूक अधिकारी हे संबंधित सहसंचालक असून, मंडळ स्तरावरील पदांचे नेमणूक अधिकारी ८ उपसंचालक मंडळे आहेत. परीक्षार्थींना प्रवेश पत्र निर्गमित करण्याची कार्यवाही १५ ऑक्टोबर २०२१ रोजी संध्याकाळी ६ वाजेपासून सुरू झाली असून, रविवारी सकाळी १० वाजेपर्यंत २ लाख ४१ हजार ५९० उमेदवारांनी प्रवेशपत्र डाऊनलोड केले. यापैकी २ हजार ८६९ उमेदवारांनी परीक्षेबाबत तक्रारी केल्या आहेत.

उमेदवारास परीक्षा केंद्र देताना प्रत्येक अर्जाचा स्वतंत्रपणे विचार करण्यात आला असून, उमेदवाराचे पद ज्या नेमणूक अधिकार्‍याचे अंतर्गत येते, त्याच विभागात उमेदवारास परीक्षा केंद्र देण्यात आले आहे. उमेदवारांच्या सुविधेसाठी यातील पहिल्या शिफ्टमध्ये दहावी ते बारावी व दुसर्‍या शिफ्टमध्ये पदवी व त्यावरील शिक्षण असणारे संवर्ग समाविष्ट केले आहेत. अ‍ॅडमिट कार्डवरील फोटो व सही अस्पष्ट असलेल्या उमेदवारांनी न्यासाकडे संपर्क साधावा. पडताळणीनंतर त्यांना प्रवेशपत्रे दिले जातील.

उमेदवारांनी सकाळ व दुपारच्या सत्रासाठी नाशिक मंडळातील संवर्गासाठी अर्ज केला असल्यास त्यास नाशिक मंडळ देण्यात आले आहे. माजी सैनिकांना शुल्क नसल्यामुळे सुमारे ९ हजार माजी सैनिकांकडून शुल्क न घेता प्रवेशपत्र देण्यात आले आहे. अहमदनगर जिल्ह्यामध्ये नागापूर नावाचे गाव असून, ते परीक्षा केंद्र आहे. त्यामुळे प्रवेशपत्रावर अहमदनगर जिल्हा उल्लेख आहे. उमेदवारांनी सर्व पदांसाठी अर्ज केले असले तरी एकाच परीक्षेसाठी बसता येणार आहे. याप्रकरणी जाहिरात अर्ज भरताना मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या आहेत.

First Published on: October 17, 2021 11:56 PM
Exit mobile version